पॉलिटिकल स्कूल बाबासाहेबांचे स्वप्न होते

By admin | Published: April 19, 2017 01:16 AM2017-04-19T01:16:31+5:302017-04-19T01:16:31+5:30

पुणे करारानुसार दलित नेतृत्त्वासाठी अपात्र माणसेच निवडली जातील. हीच माणसे मंत्रिपदे भूषवितील. पक्षाच्या

Political school Babasaheb had a dream | पॉलिटिकल स्कूल बाबासाहेबांचे स्वप्न होते

पॉलिटिकल स्कूल बाबासाहेबांचे स्वप्न होते

Next

 क्षिप्रा उके : पंजाबमध्ये उभे राहणार ‘पॉलिटिकल स्कूल’, सामाजिक निधी देण्याचे आवाहन
यवतमाळ : पुणे करारानुसार दलित नेतृत्त्वासाठी अपात्र माणसेच निवडली जातील. हीच माणसे मंत्रिपदे भूषवितील. पक्षाच्या आदेशाप्रमाणेच पोपटासारखी बोलतील. प्रसंगी समाजाला विकूनही टाकतील, ही शंका बाबासाहेबांना होती. म्हणूनच दलित नेतृत्त्व हे शीलवान असावे, त्याची भाषा, देहबोली, वेशभूषा, वक्तृत्व, सामाजिक भान इत्यादींचे त्याला प्रशिक्षण असावे. यासाठीच जुलै १९५६ मध्ये डॉ. आंबेडकरांनी ‘पोलिटिकल स्कूल’ची स्थापना केली होती. मुंबईतील सिद्धार्थ कॉलेजच्या परिसरात हे स्कूल चालविले जात आहे. त्यात १५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. ही प्रशिक्षण देणारी शाळा आम्ही विसरलो आणि पक्ष स्थापन करीत बसलो. एक माणूस एक पार्टी एवढी अवकळा आज पक्षाची झाली आहे. सर्वच नेत्यांनी दलित समाजाला भ्रमित केले आहे, असे मत जेएनयूच्या प्राध्यापिका आणि पोलिटिकल स्कूलसाठी भारतभर जनजागृती करणाऱ्या प्रा.डॉ. क्षिप्रा उके यांनी समता पर्वात मांडले.
‘लोकशाही मजबूत करण्याहेतू डॉ. आंबेडकरांचे पोलिटिकल स्कूल : ६० वर्षानंतर एक समीक्षा’ या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी किशोर भगत होते. प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळच्या नगराध्यक्ष कांचन चौधरी, माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, बसपाचे तारिक लोखंडवाला, सुनील पुनवटकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेंद्र हेंडवे, डॉ. लीलाताई भेले, प्रमोदिनी रामटेके आदी मंडळी विचार मंचावर उपस्थित होती.
डॉ. क्षिप्रा उके पुढे म्हणाल्या, दलित समाज भावनांच्या लाटेत वाहवत जातो. रिपब्लिकन पार्टीचे तुकडे-तुकडे होत असताना कोणी रस्त्यावर आले नाही. एखाद्या ठिकाणच्या बाबासाहेबांच्या मूर्तीचे बोट तुटले की सर्वजण रस्त्यावर येतात. मूर्त्या आणि पुतळे बसविण्यावरच भर दिला जातो, हे राजकारण दलितांना समजत नाही. आंबेडकरांच्या विचारांना खतपाणी देण्याची गरज असताना आम्ही फक्त घोषणा देतो. बाकी कर्तृत्व काहीच करीत नाही. ज्या दिवशी हा समाज इमोशनल ऐवजी रॅशनल होईल, त्याच दिवशी विकासाचा प्रारंभ होईल. विदर्भाच्या बाबतीत बोलताना त्या म्हणाल्या, आज सोशल सायन्सचा अभ्यास केला जात नाही. त्यामुळे सामाजिक प्रश्नच कळत नाही. महाराष्ट्रात ५२ आणि एकट्या विदर्भात ३५ समाजकार्य महाविद्यालय आहेत. सोशल वर्कस् ही गांधीजींची फिलॉसॉफी आहे. या तत्त्वज्ञानात संघर्षाऐवजी सामंजस्याला महत्त्व दिले जाते. याउलट सोशल जस्टीस हे बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान आहे. यात संघर्षाला महत्त्व दिले जाते. आज न्यायासाठी सामाजिक न्यायाची गरज आहे. दलित समाजाला दूरदृष्टीचे नेतृत्त्व मिळावे यासाठी डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या ‘पोलिटिकल स्कूल’ची नव्याने स्थापना जुलै २०१७ मध्ये पंजाबातील जालंदर येथे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी सामाजिक निधी देण्याचेही आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात कांचन चौधरी, शिवाजीराव मोघे, किशोर भगत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संचालन मन्सूर एजाज जोश यांनी, तर आभार प्रमोदिनी रामटेके यांनी मानले. (सांस्कृतिक प्रतिनिधी)

Web Title: Political school Babasaheb had a dream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.