सभापती निवडीत राजकीय उलथापालथ
By admin | Published: March 31, 2017 02:16 AM2017-03-31T02:16:53+5:302017-03-31T02:16:53+5:30
जिल्हा परिषदेत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची युती केवळ बांधकाम सभापती पदावरून फिस्कटल्याने शिवसेनेला सत्तेबाहेर राहावे लागले.
जिल्हा परिषद : शिवसेनेची नजर बांधकाम समितीवर
यवतमाळ : जिल्हा परिषदेत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची युती केवळ बांधकाम सभापती पदावरून फिस्कटल्याने शिवसेनेला सत्तेबाहेर राहावे लागले. याचा वचपा काढण्याची संधी शिवसेना शोधत असून असंतुष्टांना गळाला लावण्याच्या हालचाली सुरू आहेत. सभापती निवड प्रक्रियेत ऐनवेळी धक्का तंत्राचा वापर करून नियोजित सदस्याला सभापती पदापासून दूर ठेवण्याची व्यूहरचना आखली जात आहे.
अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी काँग्रेस, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष अशी ४१ सदस्यांची आघाडी करण्यात आली. हा सर्व खटाटोप केवळ राष्ट्रवादीच्या गटनेत्याला बांधकाम सभापती पद मिळावे म्हणून झाला. त्यामुळे शिवसेनेच्या सत्ता स्थापनेचे स्वप्न भंगले, तर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांना शेवटच्या क्षणी आपला शब्द फिरवावा लागला. याचा हिशेब चुकता करण्यासाठी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
भाजपासोडून इतर पक्षातील कोणत्याही इच्छुकाला सभापती पदासाठी समर्थन देण्याचा मनसुबा शिवसेनेने आखला आहे. सभापतीपदी निवडून येण्यासाठी ३१ चे संख्याबळ जुळविणे आवश्यक आहे. त्यासाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड प्रक्रियेमुळे काँग्रेस, भाजपाच्या काही सदस्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी कॅश करून राष्ट्रवादीच्या उर्वरित सदस्याचे समर्थन मिळविण्याचे प्रयत्न केले जात आहे. यातून अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत उलथापालथ करणाऱ्यांना धडा शिकविण्याचा चंग शिवसेनेने बांधला आहे. त्यासाठी स्थानिक शिवसेना नेत्यांनी पांढरकवड्यातील युवा शिलेदारावर विशेष जबाबदारी सोपविली आहे.
खुद्द एका सेना नेत्याने वणीतील भाजपाच्या एका असंतुष्ट सदस्याला आॅफर दिल्याची चर्चा आहे. शिवसेनेने सध्या वणी आणि मारेगाववर लक्ष केंद्रीत केले आहे. तेथे प्रतिसाद मिळाल्यास पुसदमधून पुन्हा दहाची कुमक मिळण्याची आशा शिवसेनेला आहे. त्यामुळे राजकीय घडमोडींना वेग आला आहे. शक्य होईल ते सर्व प्रयत्न शिवसेनेकडून सुरू आहे. त्याकरिता जोडतोड करण्याची जोरदार तयारी सुरू आहे. ही खेळी कितपत यशस्वी होईल, हे सोमवारी होणाऱ्या सभापती निवड प्रक्रियेतूनच सिद्ध होणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)