राजकारण्यांनी साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप करू नये - नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 05:50 AM2019-01-14T05:50:34+5:302019-01-14T05:50:50+5:30

९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप

Politiciance should not interfere in literature: Nitin Gadkari | राजकारण्यांनी साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप करू नये - नितीन गडकरी

राजकारण्यांनी साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप करू नये - नितीन गडकरी

googlenewsNext

- अविनाश साबापुरे 


यवतमाळ (राष्टÑसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नाही. राष्ट्रनीती, लोकनीती हा राजकारणाचा भावार्थ आहे. राजकारण्यांनी साहित्य किंवा इतर क्षेत्रांत हस्तक्षेप करू नये. साहित्यिक आणि राजकारणी यांच्यात सहकार्य व संवाद असला पाहिजे. जातीवाद, धर्मांधता या आजच्या समाजाच्या समस्या आहेत. सत्ताधाऱ्यांना वळण लावण्यासाठी सामाजिक दंडशक्ती निर्माण झाली पाहिजे आणि ही शक्ती साहित्यिक व पत्रकारांतूनच निर्माण होईल, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आयोजकांना ‘घरचा अहेर’ दिला.


९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा रविवारी सायंकाळी येथे समारोप झाला. त्या वेळी गडकरी बोलत होते.
ते म्हणाले, सामाजिक जागृती करण्याचे काम साहित्य करीत असते. सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा हे सर्व खोटे आहे. जीवन आनंदाने जगण्यासाठी विचारांची प्रेरणा लागते. विचारांतूनच व्यक्तिमत्त्व परिपक्व आणि भारदस्त होते. भारतीय समाजाला अशी परिपक्वता, प्रगल्भता दिली ती साहित्यानेच. चांगुलपणावर कुठेही ‘पेटंट’ होत नाही. चांगुलपणाची ‘कॉपी’ करणे वाईट नाही. कारण चांगुलपणावर कोणाचीही ‘मोनोपॉली’ नाही. ज्यांना आपण फार मोठे समजतो, त्यांच्या जवळ गेल्यावर ते फार छोटे असल्याचे कळते. तर ज्यांना आपण लहान समजतो, त्यांच्या जवळ गेल्यावर कळते की ते किती मोठे आहेत. वैशालीताई येडे यांना उद्घाटक म्हणून बोलावून आयोजकांनी महत्त्वपूर्ण काम केले.

त्यांनी भलेही पुस्तक लिहिले नसेल. पण स्वत:च्या संघर्षातून जीवन कसे जगावे याचे उदाहरण त्यांनी आपल्यापुढे ठेवले आहे, अशी दाद गडकरींनी दिली. विचार भिन्न असू शकतात. विचारभिन्नता ही समस्याच नाही. त्यापेक्षा विचारशून्यता ही मोठी समस्या आहे. आपल्या देश ज्या संरचनेवर उभा आहे, ज्या विचारांवर उभा आहे, ते अत्यंत दूरगामी परिणाम देणारे आहे. महाराष्ट्राची संस्कृती, मराठी साहित्य, महाराष्ट्राचे मराठीपण किती मोठे आहे, हे महाराष्ट्राबाहेर गेल्यावर कळते, असेही गडकरी म्हणाले.


यावेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर आदी उपस्थित होते. स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री मदन येरावार यांनी आभार मानले. विद्या देवधर यांनी अध्यक्ष या नात्याने साहित्य महामंडळाची बाजू मांडली. प्रास्ताविक कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांनी केले. तर सूत्रसंचालन कार्यवाह प्रा. घन:शाम दरणे यांनी केले.

प्रतिकूलतेने वाढविला प्रतिसाद - ढेरे
संमेलनातील भरगच्च उपस्थितीने माणसांचे अजूनही साहित्यावर प्रेम आहे, हे सिद्ध झाले. संमेलनावर बहिष्कारासारखे संकट आले होते. पण आपण एकत्र येण्याचा, संवादाचा हट्ट सोडला नाही. प्रतिकूलतेमुळेच या संमेलनाला अधिक प्रतिसाद मिळाला, अशी भावना या वेळी संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केली.

Web Title: Politiciance should not interfere in literature: Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.