सहा गटांसाठी मतदान
By admin | Published: February 21, 2017 01:20 AM2017-02-21T01:20:06+5:302017-02-21T01:20:06+5:30
जिल्हा परिषदेचे सहा गट व त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या १२ गणांसाठी दुसऱ्या टप्प्यात मंगळवार, २१ फेब्रुवारीला मतदान घेतले जाणार आहे.
आज भवितव्य मतपेटीत बंद : एक लाख ४७ हजार मतदार
यवतमाळ : जिल्हा परिषदेचे सहा गट व त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या १२ गणांसाठी दुसऱ्या टप्प्यात मंगळवार, २१ फेब्रुवारीला मतदान घेतले जाणार आहे. यात एकूण ९९ उमेदवारांचे भवितव्य पणास लागले आहे.
पहिल्या टप्प्यात ५५ गट व ११० गणांसाठी १६ फेब्रवारीला मतदान पार पडले. मात्र विडूळ-चातारी या गटातील आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने सहा गट व १२ गणांची निवडणूक लांबणीवर पडली होती. या गटांचे नव्याने आरक्षण काढण्यात आल्यानंतर आता उद्या तेथे मतदान घेतले जाणार आहे. यात कुंभा-मार्डी, घोन्सा-कायर, देऊरवाडी-सुकळी, वटफळी-अडगाव, लाडखेड-वडगाव आणि विडूळ-चातारी गटांसह १२ गणांचा समावेश आहे.
या सहा गटांपैकी तीन गट सामान्य महिलांसाठी आरक्षित आहे. त्यात कुंभा-मार्डी, वटफळी-अडगाव आणि लाडखेड-वडगाव यांचा समावेश आहे. उर्वरित तीन गट खुले आहेत. या सहा गटांमध्ये ३४ उमेदवार रिंगणात आहे. पंचायत समितीच्या १२ गणांमध्ये ६५ उमेदवार आहेत. या टप्प्यात १७९ मतदान केंद्र राहणार आहे. एक लाख ४७ हजार सहा मतदार आहेत. यात ७७ हजार ३९६ पुरूष, तर ६९ हजार ६०९ महिला मतदार आहेत.
मतदानासाठी ७१६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून १० टक्के कर्मचारी राखीव ठेवण्यात आले. याशिवाय प्रत्येक मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त राहणार आहे. त्यासाठी सुमारे ४०० पोलीस व होमगार्ड तैनात करण्यात आले आहे. सर्व निवडणूक कर्मचारी आपापल्या केंद्रावर रवाना झाले आहे. (शहर प्रतिनिधी)
सर्वाधिक मतदार घोन्सामध्ये
सहापैकी घोन्सा-कायर गटात सर्वाधिक २६ हजार ७९८ मतदार आहे. त्या खालोखाल विडूळ-चातारी गटात २६ हजार २८० मतदार आहेत. कुंभा-मार्डी गटात २५ हजार ७९१, देउरवाडी-सुकळी गटात २३ हजार २६२, लाडखेड-वडगाव गटात २२ हजार ७६४, तर वटफळी-अडगाव गटात सर्वात कमी २२ हजार १११ मतदार आहेत.
महिलांचे पुरूषांना आव्हान
दुसऱ्या टप्प्यातील सहापैकी तीन गट खुले आहे. या तीनपैकी वटफळी-अडगाव आणि लाडखेड-वडगाव या दोन खुल्या गटात महिला उमेदवारांनी पुरूष उमेदवारांना आव्हान दिले आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.