घारफळ येथे गेलेली पोलिंग पार्टी तर्र
By admin | Published: August 22, 2016 01:02 AM2016-08-22T01:02:20+5:302016-08-22T01:02:20+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची घारफळ येथे गेलेली पोलिंग पार्टी मध्यरात्री तर्र असल्याने पुढे आले.
बाभूळगाव बाजार समिती निवडणूक : मेडिकलमध्ये दोघे आढळले नशेत
बाभूळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची घारफळ येथे गेलेली पोलिंग पार्टी मध्यरात्री तर्र असल्याने पुढे आले. कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली असता दोघे जण नशेत आढळून आले. मात्र वृत्तलिहेस्तोवर या प्रकरणी बाभूळगाव ठाण्यात तक्रार देण्यात आली नव्हती.
घारफळ येथे निवडणूक केंद्रावर शनिवारी रात्री पोहोचलेले कर्मचारी मतपत्रिकेवर दारूच्या नशेत शिक्के मारत असल्याचा फोन कुणी तरी बाभूळगाव ठाण्यात केला. त्यावरून पोलीस पथक घारफळ येथे पोहोचले. पाच कर्मचाऱ्यांना रात्री २ वाजता यवतमाळच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी केली. त्यावेळी दोन कर्मचारी दारूच्या नशेत असल्याचा अहवाल आल्याचे पोलिसांनी सांगितले. ठाणेदार हनुमंतराव गायकवाड यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना या संदर्भात पत्र देऊन तक्रार देण्यास सूचविले. मात्र वृत्तलिहेस्तोवर कोणीही तक्रार केली नव्हती. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी कैलास खटारे यांनी दुसऱ्या कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रावर नियुक्ती केली आहे. या घटनेने बाभूळगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली. (प्रतिनिधी)