जिल्ह्यातील नद्यांमध्ये प्रदूषण वाढतेय
By admin | Published: June 4, 2014 12:22 AM2014-06-04T00:22:59+5:302014-06-04T00:22:59+5:30
जिल्हय़ातून वाहणार्या नद्या प्रदूषित झाल्या असून बेशरम आणि जलपर्णीच्या विळख्यात अडकल्या आहे. मूळ पात्र अरुंद झाले असून दरवर्षी नदी तिरावरील शेकडो गावांना त्यामुळे पुराचा फटका बसतो.
शुद्धीकरण मोहीम गरजेची : पावसाळ्यात नदी किनार्यावरील लोकांना फटका
यवतमाळ : जिल्हय़ातून वाहणार्या नद्या प्रदूषित झाल्या असून बेशरम आणि जलपर्णीच्या विळख्यात अडकल्या आहे. मूळ पात्र अरुंद झाले असून दरवर्षी नदी तिरावरील शेकडो गावांना त्यामुळे पुराचा फटका बसतो. त्यात कोट्यवधीचे नुकसान होत असले तरी प्रशासन मात्र नदी शुद्धीकरण मोहीम राबवित नाही. परिणामी नदी तिरावरील गावकर्यांना पावसाळा आला की जीव मुठीत घेऊन राहावे लागते.
यवतमाळ जिल्हय़ामध्ये वर्धा व पैनगंगा या प्रमुख नद्या आहेत. दोनही नद्या जिल्हय़ाच्या अनुक्रमे इशान्य व दक्षिण सीमेवरील वाहतात. जिल्हय़ाच्या मध्यभागात वाहणार्या उपनद्या वर्धा व पैनगंगा नद्यांना मिळतात. वर्धा नदी रुंदी अधिक असून खोलदेखील आहे. वर्धेच्या बेंबळा व निगरुडा या दोन प्रमुख उपनद्या आहेत. त्यापैकी निगरुडा नदी पूर्णत: वणी तालुक्यातून वाहते. तर बेंबळा बाभूळगाव तहसीलच्या उत्तरेकडून घाटाच्या पायथ्याशी वाहते. पैनगंगा नदीला सहा प्रमुख उपनद्या आहेत. पूस, अरुणावती, अडाण, वाघाडी, खुनी, विदर्भ या नावाने त्या ओळखल्या जाते. या सोबतच अनेक लहान-मोठय़ा नद्या व नाले आहेत. जिल्हय़ाला सुपीक बनविण्यात या नद्यांचा मोठा हातभार लागला आहे. काही नद्या बाराही महिने खळखळून वाहतात तर काही हिवाळ्यातच कोरड्या पडतात. जिल्हय़ासाठी जीवनदायिनी असलेल्या या नद्या मात्र सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्या आहेत.
नदी पात्रात मोठय़ा प्रमाणात बेशरम वाढला आहे. मोठाले झुडुपे नदीपात्रात दिसून येतात. अडाण, पूस, धावंडा, गोखी, अरुणावती या नद्यांना बेशरमने आपल्या कवेत घेतले आहे. नदीचे पात्र पूर्ण हिरवेगार दिसते. तसेच काही नद्यात जलपर्णी वनस्पती वाढली आहे. बेशरम आणि जलपर्णी वनस्पतीमुळे पाणी वाहून जाण्यास अडचण निर्माण होते. झुडुपांमध्ये मोठय़ा प्रमाणात केरकचरा अडकून असतो. पहिल्या पुरासोबत आलेला कचरा या झुडुपांना अडकतो. त्यामुळे नदीचा प्रवाह बदलतो. थोडे जरी पाणी आले तरी नदीची थडी फुटून पाणी गावात शिरते. तसेच शेतातही शिरून मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. दरवर्षी त्याच त्या गावांना पुराचा फटका बसतो.
पुरामुळे कोट्यवधीचे नुकसान होत असले तरी प्रशासन मात्र नदी शुद्धीकरणाकडे दुर्लक्ष करते. आजपर्यंत प्रशासनाने नदी शुद्धीकरणाकडे लक्षच दिले नाही. यापूर्वी महात्मा फुले जल व भूमी अभियान राबविण्यात आले होते. तलावात साचलेला गाळ काढण्याचा प्रयत्न झाला. यासोबतच नदी पात्रातील बेशरम काढण्याची गरज होती. प्रशासनाने नदी पात्र शुद्धीकरण मोहीम हाती घेतली असती तर काही अंशी पुराचा प्रकोप कमी करण्यात यश आले असते. परंतु प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न नद्यांसाठी होतांना दिसत नाही. (प्रतिनिधी)