वणीत खाणींमुळे नद्यांचे प्रदूषण वाढले, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2021 12:59 PM2021-12-26T12:59:48+5:302021-12-26T13:08:35+5:30
वणी शहरात निर्गुडा नदीच्या काठावर दोन्हीही बाजूने नव्या वसाहती तयार झाल्या आहेत. या वसाहतीतील अतिशय घाण पाणी नदीकडे वळविण्यात आले असून हे पाणी नियमितपणे नदीच्या पाण्यात मिसळत आहे.
यवतमाळ : वणी तालुक्यातील कोळसा खाणींमुळे नैसर्गिकरित्या वाहणाऱ्या नद्यांच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. या नद्यांवर अनेक गावे पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीच्या सिंचनासाठी निर्भर आहेत. प्रदूषित पाणी पिल्याने त्याचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. अनेक गावात नदीपात्रातून पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र जलशुद्धीकरणाचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे नागरिकांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे.
वणी तालुक्यातून विदर्भा, निर्गुडा, वर्धा या तीन महत्त्वाच्या नद्या वाहतात. विदर्भा नदी ही घोन्सा गावाजवळून वाहते. घोन्सालगतच खुली कोळसा खाण काही वर्षांपूर्वी सुरू झाली. त्यामुळे घोन्सा भागातील नदीचे पात्र पूर्णत: दूषित झाले आहे. अनेकदा या नदीतून काळे पाणी वाहताना दिसते. खाणीतून निघणारे केमिकलयुक्त पाणी नदीपात्रात सोडले जाते. नागरिकांनी ओरड केल्यानंतर हा प्रकार बंद होतो. मात्र, अधूनमधून हे पाणी सोडले जाते. या नदीवर अनेक गावांची तहान भागविली जाते. तसेच शेतीच्या सिंचनासाठी पाण्याचा वापर केला जातो. केमिकलयुक्त पाण्याच्या वापराने केवळ मानवी आरोग्यच नाही, तर शेती उत्पादनावरही परिणाम होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.
कोळसा खाणींमुळे वर्धा नदी तर अस्थिपंजर झाली आहे. या नदीच्या काठावर अनेक ठिकाणी मातीचे डोंगराएवढे ढिगारे उभे करण्यात आले. त्यामुळे या नदीचे पात्र अनेक ठिकाणी बदलल्याचे पहायला मिळते. अनेक भागातून उद्योगांचे पाणी या नदीत पोहोचते. हे पाणी अतिशय विषारी स्वरूपाचे असते. पाळीव जनावरे याच नदीचे पाणी पितात. त्यामुळे या जनावरांचे आरोग्यदेखील धोक्यात आले आहे.
वणी परिसरात धूळ प्रदूषणासह जल प्रदूषणाचीदेखील मोठी समस्या निर्माण झाली आहे. मात्र, या विषयात कोणीही आवाज उठविताना दिसत नाही. मुळात खनिज विकास निधीतील २५ टक्के रक्कम ही जल प्रदूषणावर निर्बंध आणण्यासाठी खर्च केली जाणे अपेक्षित आहे. मात्र, त्यासाठी प्रशासन कायम उदासीन असल्याचे दिसून येते. यातून अनेक गावातील नागरिकांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो.
कॉलनीतील दूषित पाणी सोडले जाते निर्गुडा नदीत
वणी शहरात निर्गुडा नदीच्या काठावर दोन्हीही बाजूने नव्या वसाहती तयार झाल्या आहेत. या वसाहतीतील अतिशय घाण पाणी नदीकडे वळविण्यात आले असून हे पाणी नियमितपणे नदीच्या पाण्यात मिसळत आहे. त्यामुळे वणी शहरालगतच्या पात्रातील पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे. मध्यंतरी पालिकेने पुढाकार घेऊन नदीत घाण पाणी जाऊ नये, यासाठी उपाययोजनका केली होती. परंतु, ही उपाययोजना फार काळ टिकली नाही. अजूनही घाण पाणी या नदीत सोडले जात आहे.