पुसदमध्ये सांडपाण्याचे तळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 11:31 PM2018-01-06T23:31:15+5:302018-01-06T23:31:28+5:30
शहरातील अनेक भागात सांडपाण्याचे तळे साचले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नगरपरिषदेकडे वारंवार तक्रारी करून उपयोग होत नसल्याने नागरिक वैतागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शहरातील अनेक भागात सांडपाण्याचे तळे साचले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नगरपरिषदेकडे वारंवार तक्रारी करून उपयोग होत नसल्याने नागरिक वैतागले आहे.
शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अनेक रस्त्यांवर नालीतील सांडपाणी वाहात आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. साथीच्या आजारांमुळे नागरिक बेजार झाले आहे. याबाबत नगरपरिषदेकडे अनेकांनी वारंवार तक्रार केली. तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी नागरिकांना आजारांना सामोरे जावे लागत आहे.
शहरातील अमराई मेमन ले-आऊटमध्ये तर सांडपाण्याचे अक्षरश: तळे साचले आहे. गेल्या दहा वर्षांपासून सांडपाण्याचे तळे निर्माण झाले आहे. या सांडपाण्यात डासांची उत्पत्ती होत असल्याने परिसरातील नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. परिणामी दहा वर्षांपासून हे सांडपाण्याचे तळे जैसे थे आहे. शहरातील इतरही अनेक परिसरात सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. नागरिकांना डेंग्यू, मलेरिया, हिवताप, कावीळ, गॅस्ट्रो आदी आजारांचा सामना करावा लागत आहे. तथापि नागरिकांच्या आरोग्याचे नगरपालिकेला कोणतेही सोयरसूतक नाही.
मेमन ले-आऊटमध्ये खुल्या जागेत जवळपास चार हजार ८७४ चौरस फूट जागेत खड्डा आहे. या खड्ड्यात शहरातील सांडपाणी साचत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
तक्रारींकडे दुर्लक्ष
अनेकदा पालिकेकडे तक्रारी करून दुर्लक्ष होत असल्याने नागरिक आता प्रचंड संतप्त झाले आहे. या सांडपाण्याच्या तळ्यामुळे शहरात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सदर परिसरात धार्मिकस्थळ असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी नगराध्यक्ष तसेच मुख्याधिकाºयांना निवेदन देवून सांडपाणी इतरत्र काढून देण्याची मागणी केली आहे. न्याय न मिळाल्याचा वरिष्ठांकडे दाद मागण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.