Pooja Chavan Suicide: स्त्रीरोग विभाग प्रमुख सहा दिवस होते रजेवर; पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी गूढ आणखी वाढलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 07:43 PM2021-02-17T19:43:49+5:302021-02-17T19:43:56+5:30
पूजा चव्हाण संशयित मृत्यूप्रकरणात यवतमाळातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव चर्चेत आले आहे.
यवतमाळ: पुणे येथील पूजा चव्हाण संशयित मृत्यूप्रकरणात यवतमाळातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव चर्चेत आले आहे. त्या अनुषंगाने पुणे पोलिसांचे पथक यवतमाळ मेडिकलमध्ये येऊन गेले. ६ फेब्रुवारीला पहाटे ४ वाजून ३४ मिनिटांनी मेडिलकच्या प्रसूती वार्ड क्र. ३ मध्ये दाखल झालेली ती युवती नेमकी कोण याचा उलगडा झालेला नाही. दाखल झालेल्या त्या युवतीचा पत्ताही नांदेड जिल्ह्यातील नोंदविण्यात आला आहे. यावरून संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग विभागात ६ फेब्रुवारीला पहाटे ४.३४ वाजता दाखल झालेल्या त्या २२ वर्षीय तरुणीचा गर्भपात करण्यात आला. तिच्या शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत उपचार करण्यात आले. नंतर तिला सुटी देण्यात आली. उपचारासाठी दाखल तरुणी नेमकी कुठली हे स्पष्ट झाले नाही. ज्या युनिट २ मध्ये ती दाखल झाली, त्या युनिटच्या डॉक्टरांनाही याबाबत काहीच माहिती नाही. पहाटे तिला दाखल करून उपचार करणे डॉक्टर कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गर्भपात अर्धवट अवस्थेत झाल्यानंतर दाखल तरुणीला काही तासातच रुग्णालयातून सुटी कशी देण्यात आली, हेही एक कोड आहे.
विशेष म्हणजे या सर्व घडामोडी पुणे येथील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर उजेडात आल्या आहेत. त्यामुळे या सर्व घटनाक्रमाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. पूजा चव्हाण हिलाच नाव बदलवून यवतमाळ मेडिकलमध्ये दाखल केल्याचेही बोलले जात आहे. त्याच अनुषंगाने पुणे पोलिसांचे पथक सोमवारी यवतमाळात येऊन गेले.
पूजाच्या मृत्यू प्रकरणात येथील अधिष्ठातांना सूचना पत्र देऊन पोलिसांनी १ ते ६ फेब्रुवारी दरम्यानची माहिती मागितली आहे. तशी नोंद त्यांनी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात केली होती. त्या युवतीच्या गर्भपात प्रकरणात युनिट २ च्या डॉक्टरांचे नाव माध्यमात झळकल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. पूजा चव्हाण नव्हे तर पूजा अरुण राठोड नावाची तरुणी दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र तिच्यावर युनिट १ च्या डॉक्टरांनी उपचार केल्याने त्याबाबत अधिक कुठलीही माहिती नसल्याचे ‘लाेकमत’ला सांगितले.
Pooja Chavan Suicide Case : 'पूजा अरुण राठोड'च्या गर्भपाताच्या रिपोर्टमुळे चर्चेला उधाण, पण डॉक्टर म्हणतात... pic.twitter.com/d1G7PKxqXl
— Lokmat (@MiLOKMAT) February 17, 2021
स्त्रीरोग विभाग प्रमुख रजेवर
वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीराेग विभाग प्रमुख सहा दिवस रजेवर होते. ते मंगळवार (१६ फेब्रुवारी) पुन्हा सेवेत रुजू झाले. मात्र बुधवारी विभाग प्रमुख रुग्णालयात दिसलेच नाही. या घटनाक्रमाबाबत त्यांच्याशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही. युनिट १ विभाग प्रमुखांच्या नियंत्रणात आहे. त्यामुळे त्या तरुणीवरील उपचाराचा उलगडा झालेला नाही. रुग्णालय प्रशासनाकडून कोणीही अधिकृत बोलण्यास तयार नाही.