पूल कमकुवत, तरीही वाहतूक सुसाट
By admin | Published: August 5, 2016 02:32 AM2016-08-05T02:32:19+5:302016-08-05T02:32:19+5:30
रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीवरील बिटीशकालीन पूल वाहून गेल्यामुळे जिल्ह्यातील पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
यवतमाळ : रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीवरील बिटीशकालीन पूल वाहून गेल्यामुळे जिल्ह्यातील पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यात तूर्तास केवळ बोरीअरब येथील अडाण नदीवर एकच ब्रिटीशकालीन पूल वाहतुकीसाठी उपयोगात आणला जात आहे. ब्रिटीशकालीन असलेल्या नांदुरा येथील पुलावरून सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतूक बंद केली आहे.
कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीवरील पूल मंगळवारी मध्यरात्री वाहून गेला. त्यावेळी या पुलावरून प्रवास करणाऱ्या काही बस व खासगी वाहनांना जलसमाधी मिळाली. यात जवळपास ४० च्यावर नागरिकांचे बळी गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या दुर्घटनेनंतर शासनाने राज्यातील सर्व पुलांचे अंकेक्षण करण्याचा निर्णय जाहीर केला. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील पुलांचा आढावा घेतला असता, समाधानकारक स्थिती आढळली. सध्या जिल्ह्यात केवळ बोरीअरब येथील एकाच ब्रिटीशकालीन पुलावरून वाहतूक सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली.
जिल्ह्यात दोन ब्रिटीशकालीन पूल आहे. त्यापैकी बाभूळगाव तालुक्यातील नांदुरा येथील बेंबळा नदीवरील पूल सन २००८-०९ पासून सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतुकीसाठी बंद केला आहे. आता केवळ दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील अडाण नदीवरील ब्रिटीशकालीन पुलावरूनच अद्याप वाहतूक सुरू आहे. या पुलाची काही वर्षांपूर्वी दुरूस्ती करण्यात आली. तथापि हा पूल ब्रिटीशकालीन असल्याने बांधकाम विभागाने तेथे नवीन पुलाचा प्रस्ताव कधीचाच शासनाकडे पाठविला. मात्र त्याला अद्याप मंजुरी मिळाली नाही. परिणामी महाडसारखी दुर्घटना घडल्यानंतरच शासन बोरीअरब येथील नवीन पुलाच्या निर्मितीचा प्रस्ताव मंजूर करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात जवळपास ३२ मोठे पूल आहेत. ३० मीटर अथवा त्यापेक्षा लांबीच्या पुलाला मोठे पूल म्हणून ओळखले जाते. याशिवाय जवळपास प्रमुख ३० लहान पूल आहे. त्यापैकी पांढरकवडा तालुक्यातील रूंझा आणि पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथील पूल जीर्ण झाले आहेत. या दोन्ही ठिकाणी नवीन पुलांचे प्रस्ताव आहे. मात्र अद्याप त्यांनाही मान्यता मिळाली नाही. परिणामी अद्यापही जुन्याच जीर्ण पुलावरून वाहतूक सुरू आहे.