गोरगरिबांना मोफत धान्य मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:40 AM2021-05-16T04:40:17+5:302021-05-16T04:40:17+5:30
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही गोरगरिबांना मोफत धान्य मिळाले नाही. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ एप्रिलपासून संचारबंदी आहे. यामुळे सामान्य नागरिकांवर ...
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही गोरगरिबांना मोफत धान्य मिळाले नाही. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ एप्रिलपासून संचारबंदी आहे. यामुळे सामान्य नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी अन्न सुरक्षा योजना सुरू करण्यात आली. मोफत अन्नधान्य योजनेतून लाभार्थींना प्रतिव्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य देण्याचे १३ एप्रिलला जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर १५ एप्रिलला रात्री ८ वाजेपासून राज्यामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले.
सरकारने मोफत जाहीर केलेले धान्य घेण्यासाठी तालुक्यातील हजारो शिधापत्रिकाधारकांनी शिधा वाटप दुकानांकडे धाव घेतली. मात्र, दुकानदारांकडून अद्याप मोफत धान्य वाटपासंदर्भात आदेश आले नाहीत, धान्याचा कोटा आला नाही, धान्य कधी येईल सांगता येत नाही, असे म्हणून टोलवले जात आहे. आतापर्यंत लॉकडाऊन काळात गोरगरीब लाभार्थींना रेशन दुकानातून मोफत धान्याचा पुरवठा करायला हवा होता. मात्र, तहसीलदारांचे धान्य वाटपाकडे दुर्लक्ष झाल्याने हजारो लाभार्थींना मोफत धान्य मिळण्यासाठी मे महिना उजाडला आहे. अजून किती दिवस वाट पाहावी लागेल, हेसुद्धा सांगता येत नाही.
बॉक्स
केवळ आदेश आले, धान्य नाही
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ मोफत वाटपाचा आदेश प्राप्त झाला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी मे महिन्यात हाेईल की नाही, याबाबत साशंकता आहे. कारण जिल्हा पुरवठा विभागाकडून तसा कोटा प्राप्त झाला नाही, असे सांगितले जात आहे.