ग्रामीण भागात आरोग्याचे बेहाल; शस्त्रक्रिया करायचीय? मग घरूनच आणा खाटा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 12:26 PM2022-01-11T12:26:52+5:302022-01-11T12:39:42+5:30
दुरवस्थेसाठी पारवा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी १८ लोखंडी खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यातील काही कर्मचारी घरी घेऊन गेले. दोन दिवसांपूर्वी शस्त्रक्रियेसाठी १८ महिलांना बोलविण्यात आले. परंतु खाटा पंधराच होत्या.
अब्दुल मतीन
यवतमाळ :आरोग्य विभागावर आलेल्या गरिबीचा उत्कृष्ट नमुना पारवा (ता. घाटंजी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाहायला मिळाला. घरून खाट आणत असाल तरच कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केली जाईल, अशी अट घातली गेली. अखेर ही सोय झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया पार पाडण्यात आली. यानंतरही शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना कुडकुडत उपचार घ्यावे लागले. यावरून आरोग्य यंत्रणा नागरिकांच्या आरोग्याविषयी किती बेफिकीर आहे, हे दिसून येते.
दुरवस्थेसाठी पारवा प्राथमिक आरोग्य केंद्र सर्वपरिचित आहे. चांगली आरोग्यसेवा याठिकाणी उपलब्ध होत नाही. कायम अडचणींचा पाढा याठिकाणी कार्यरत यंत्रणेकडून वाचला जातो. स्वत:चे दोष मात्र लपविले जातात. या आरोग्य केंद्रात सातत्याने कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर घेतले जाते. रुग्णांसाठी १८ लोखंडी खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यातील काही कर्मचारी घरी घेऊन गेले. दोन दिवसांपूर्वी शस्त्रक्रियेसाठी १८ महिलांना बोलविण्यात आले. परंतु खाटा पंधराच होत्या.
खाटांअभावी शस्त्रक्रिया अडचणीत आल्या. याठिकाणच्या यंत्रणेने त्यांना घरून खाटा आणण्याची सूचना केली. अखेर या लाभार्थ्यांनी ही सोय केली. आरोग्य केंद्रात लाकडी खाटाही दिसू लागल्या. या आरोग्य केंद्रामध्ये रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविल्या जात नाहीत. प्रचंड गैरसोयीचा सामना त्यांना करावा लागतो.
गुरुजींनी दिलेले वॉटर फिल्टर बंद
पारवा प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी काही शिक्षक मंडळींनी वॉटर फिल्टर लावून दिले. गेली अनेक महिन्यांपासून ही मशिन बंद आहे. ती दुरुस्त करण्याची गरज आरोग्य विभागाला कधी वाटली नाही.
रुग्ण कल्याण निधीचा उपयोग कोठे?
प्राथमिक आरोग्य केंद्राला दरवर्षी लाखो रुपये रुग्ण कल्याण निधी उपलब्ध होतो. यातून दिसू शकेल अशी कुठलीही कामे होत नाहीत. अशा वेळी हा निधी कोठे खर्ची घातला जातो, हा प्रश्न उपस्थित होत आहे. रुग्णवाहिकेची काच काही महिन्यांपूर्वी फुटली असून, नवीन बसविण्याची तसदी घेण्यात आली नाही.
उपाशी रहा म्हटले अन् डॉक्टरच आले नाही
कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी आलेल्या रुग्णांना यंत्रणेकडून त्रास सहन करावा लागत असल्याची ओरड आहे. ७ जानेवारी रोजी शस्त्रक्रिया निश्चित करण्यात आल्याने सकाळी ८ वाजतापासून महिलांना उपाशी राहण्यास सांगण्यात आले. मात्र, त्या दिवशी डॉक्टरच आले नाहीत.
वैद्यकीय अधिकाऱ्याचा नो रिस्पॉन्स
प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पुराम यांच्याशी पीएचसीतील गैरसोयीविषयी विचारणा करण्याकरिता भ्रमणध्वनीवर संपर्क करण्यात आला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. नेहमीच त्यांच्याकडून असा प्रकार घडत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत, तसेच घाटंजी तालुका अधिकारी धर्मेश चव्हाण यांच्याशी संपर्क करण्यात आला. त्यांनी आपण मीटिंगमध्ये असल्याचे सांगितले.
रुग्णांना खाटा आणायला सांगितल्या नाहीत. आरोग्य केंद्राच्या यंत्रणेनेच व्यवस्था करून घेतली. पीएचसीच्या आवारात बोअरला पाणी लागले नाही. त्यामुळे वेळोवेळी पर्यायी व्यवस्था करून घेतली जाते. आरोग्य केंद्राचे इतर प्रश्नही मार्गी लावण्याचे प्रयत्न आहेत.
- पावनी कल्यमवार, अध्यक्ष, रुग्ण कल्याण समिती, पीएचसी पारवा.