गरिबांनो, किलोभर साखरेत करा दिवाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 10:20 PM2018-10-30T22:20:52+5:302018-10-30T22:22:55+5:30
गेल्या चार वर्षांपासून जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपा सरकारने गोरगरीब जनतेवर अवघ्या एक किलो साखरेत दिवाळी साजरी करण्याची वेळ आणली आहे. शासकीय स्वस्त धान्य दुकानातून गोरगरिबांना दिवाळीच्या निमित्ताने प्रती कार्ड केवळ एक किलो साखर दिली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गेल्या चार वर्षांपासून जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपा सरकारने गोरगरीब जनतेवर अवघ्या एक किलो साखरेत दिवाळी साजरी करण्याची वेळ आणली आहे. शासकीय स्वस्त धान्य दुकानातून गोरगरिबांना दिवाळीच्या निमित्ताने प्रती कार्ड केवळ एक किलो साखर दिली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील सरकार, जिल्हा प्रशासन व पुरवठा विभागाविरूद्ध जनतेत रोष पाहायला मिळतो आहे.
राज्यात सव्वा पाच लाख रेशनकार्डधारक आहेत. त्यांची दिवाळी गोड करण्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने केली. आता खूप काही आपल्या पदरी पडेल अशी अपेक्षा या गोरगरीब कार्डधारकांना होती. मात्र प्रत्यक्षात भाजपा सरकारचा दिवाळीचा हा बार फुसका निघाला. दिवाळी गोड करण्यासाठी शासनाकडून रेशन कार्डवर केवळ एक किलो साखर दिली जाणार आहे. त्याचा दर २० रुपये प्रती किलो राहणार आहे. चार ते सहा जणांच्या कुटुंबाला किलोभर साखर दिवाळीसाठी पुरणार कशी, हा प्रश्न आहे. सरकारस्तरावर दौरे, बैठका, उद्घाटन, भूमिपूजन या माध्यमातून लोकप्रतिनिधी व अधिकाºयांकडून प्रचंड उधळपट्टी शासकीय तिजोरीतून सुरू आहे. तर दुसरीकडे गोरगरिबांना दिवाळीसारख्या सर्वात मोठ्या सणासाठी अवघी किलोभर साखर देऊन त्यांची बोळवण केली जात असल्याने गरिबांमध्ये केंद्र व राज्यातील भाजपा सरकारविरोधात तीव्र असंतोष पाहायला मिळत आहे.
४० टक्के पुरवठा कमी
रेशन कार्डावरील वाटपासाठी ५३० मेट्रिक टन साखर मंजूर करण्यात आली. त्याचप्रमाणे तूर डाळ ५३० मेट्रिक टन, चणाडाळ १९७ मेट्रिक टन, उडीद डाळ ९७ मेट्रिक टन मंजूर करण्यात आली. यापैकी ६० टक्के मालाचा पुरवठा जिल्ह्याला झाला असून ४० टक्क्यांची मागणी आणखी नोंदविली गेली आहे.