रेतीसाठी गरिबांची घरकुले अडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 09:59 PM2019-01-17T21:59:51+5:302019-01-17T22:02:51+5:30
पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलाचे ८० टक्के काम जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना केंद्राच्या आहे. असे असले तरी, प्रत्यक्षात रेतीच उपलब्ध न झाल्याने १३ हजार २४५ घरकुलाचे काम रखडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलाचे ८० टक्के काम जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना केंद्राच्या आहे. असे असले तरी, प्रत्यक्षात रेतीच उपलब्ध न झाल्याने १३ हजार २४५ घरकुलाचे काम रखडले. आता उरलेल्या १३ दिवसात २६ टक्के काम पूर्ण करण्याचे आव्हान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेपुढे निर्माण झाले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, पारधी आवास योजना, शबरी आवास योजना या माध्यमातून घरकुलांचे बांधणी करायची होती. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेला १८ हजार ४३४ घरकुलांची उद्दीष्ट देण्यात आले होते. यापैकी ५६ टक्के काम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला करता आले. आतापर्यंत ११ हजार ३१८ घरांचे काम ही यंत्रणा पूर्ण करू शकली.
रमाई आवास योजनेत पाच हजार ५१३ घरकुलांचे काम पूर्ण करायचे होते. प्रत्यक्षात एक हजार ५०२ घरे पूर्ण झाली. एकूण उद्दिष्टांच्या ४० टक्के मजल याठिकाणी गाठता आली. शबरी आवाज योजनेत दोन हजार १९८ घरे बांधायची होती. यातील ८७२ घरांची कामे पूर्ण झाली आहेत. कोलाम आवास योजनेत ९६९ घरकूल पूर्ण करायचे होते. त्यातील केवळ २४३ घरे पूर्ण झाली. पारधी आवास योजनेत १२७ पैकी केवळ ६२ घरांचे बांधकाम झाले आहे.
घरकुलाची कामे रखडण्याला रेती कारणीभूत ठरली आहे. सप्टेंबरपासून रेतीघाटांचा लिलाव झाला नाही. यामुळे घरकूल बांधकामासाठी रेती उपलब्ध होऊ शकली नाही. यातून बांधकामे ठप्प पडली. जानेवारी अखेरपर्यंत उद्दिष्टांच्या ८० टक्के काम पूर्ण करण्याचे केंद्र शासनाचे आदेश आहे. रेतीघाटाचे लिलाव अजूनही झाले नाही. यामुळे उर्वरित उद्दीष्ट पूर्ण होण्याविषयी प्रश्नचिन्ह आहे.
दुष्काळामुळे पुढील घरे होणार कशी ?
रेतीअभावी घरकुलाचा पहिला टप्पा अडकला. आता दुष्काळी स्थितीने पाण्याअभावी इतर घरकुले रखडण्याची चिन्हे आहे. यामुळे बेघरांचे घरकुलाचे स्वप्न यावर्षी पूर्ण होण्याविषयी साशंकता आहे.