गोखीचे पाणी मेपर्यंत अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 12:24 AM2018-04-17T00:24:27+5:302018-04-17T00:24:51+5:30

शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर तत्काळ मिळणाऱ्या गोखी प्रकल्पाच्या पाण्याकडे यवतमाळकरांच्या नजरा लागल्या आहे. परंतु पाणीपुरवठ्यासाठी लागणारे अत्यावश्यक पाईपच अद्याप यवतमाळात पोहोचले नाही. तर इतर कामांसाठी १५ दिवसांचा अवधी लागणार आहे.

Poor water is impossible | गोखीचे पाणी मेपर्यंत अशक्य

गोखीचे पाणी मेपर्यंत अशक्य

googlenewsNext
ठळक मुद्देपाईप पोहोचलेच नाही : कामासाठी लागणार १५ दिवसांचा अवधी

रूपेश उत्तरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर तत्काळ मिळणाऱ्या गोखी प्रकल्पाच्या पाण्याकडे यवतमाळकरांच्या नजरा लागल्या आहे. परंतु पाणीपुरवठ्यासाठी लागणारे अत्यावश्यक पाईपच अद्याप यवतमाळात पोहोचले नाही. तर इतर कामांसाठी १५ दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे गोखीच्या पाण्यासाठी यवतमाळकरांना मे महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणारे निळोणा आणि चापडोह प्रकल्प कोरडे पडले. बेंबळा प्रकल्पाचे पाणीही लवकरच मिळण्याची आशा नाही. त्यामुळे गोखी प्रकल्पाचा पर्याय पुढे आला. त्यासाठी युद्ध पातळीवर कामकाज हाती घेण्यात आले. यवतमाळ शहरापासून २७ किलोमीटर अंतरावरील गोखी प्रकल्पाचे पाणी यवतमाळच्या एमआयडीसीत येते. तेथून पाणी दर्डानगरच्या टाकीपर्यंत आणण्यासाठी पाईपलाईन टाकली जाणार आहे. औद्योगिक वसाहत ते दर्डानगर हे ४.२० किमी अंतर आहे. आता औद्योगिक वसाहत ते लोहारा येथील पाण्याच्या टाकीपर्यंत गोखी प्रकल्पाचे पाणी आणले जाईल. तेथून दर्डानगर पाण्याच्या टाकीपर्यंत २००७ मध्ये टाकण्यात आलेल्या २०० एमएम पीव्हीसी पाईपने पाणी आणले जाईल.
औद्योगिक वसाहतीपासून लोहाराच्या टाकीपर्यंत पाईप टाकण्यासाठी खोदकाम सुरू झाले आहे. एमआयडीसीतील मुख्य चौकापर्यंत खोदकामही झाले आहे. परंतु अद्यापपर्यंत पाईपच आले नाही. त्यामुळे या पाईपची सर्वांना प्रतीक्षा आहे. विशेष म्हणजे सदर पाईप शनिवारी यवतमाळात पोहोचणार होते. परंतु सोमवारपर्यंत पाईप आले नव्हते. पाईप आल्यानंतर कामाला सुरुवात होईल. त्यासाठी १५ दिवसाचा अवधी लागणार आहे. त्यामुळे गोखीचे पाणी मिळण्यासाठी मे महिना उजाडणार आहे.
अतिरिक्त पाणी सममध्ये जाणार
गोखी प्रकल्पाचे पाणी दर्डानगर टाकीत पोहोचल्यानंतर दर्डानगर, वडगाव, लोहारा, सुयोगनगरातील सुमारे ८० हजार लोकसंख्येपर्यंत पाणी पोहोचणार आहे. ज्या दिवशी गोखी प्रकल्पातून अधिक पाणी खेचले जाईल. ते पाणी जीवन प्राधिकरणाच्या सममध्ये सोडले जाईल आणि तेथून ते शहरातील इतर भागांना वितरित केले जाणार आहे.
दररोज मिळणार २० लाख लिटर पाणी
गोखी प्रकल्पातून दररोज २ एमएल म्हणजे २० लाख लिटर पाण्याचा पुरवठा करण्याच्या प्रस्तावाला औद्योगिक वसाहतीने मान्यता दिली आहे. त्यामुळे शहरातील काही भागांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. गोखी प्रकल्पाचा मृतसाठा हा निळोणा प्रकल्पाच्या संपूर्ण साठ्याएवढा आहे. गोखी प्रकल्पात १.५ दलघमी जीवंत साठा आणि ७.५१ दलघमी मृतसाठा आहे. जीवंत साठा संपला तरी सहा महिने पुरेल एवढा मृतसाठा या प्रकल्पात आहे.

Web Title: Poor water is impossible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.