गरिबांची पोरं विमानात बसून जाणार दिल्लीला..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 06:00 AM2019-12-18T06:00:00+5:302019-12-18T06:00:15+5:30
गरिबांची लेकरं लवकरच खऱ्याखुऱ्या विमानात बसून उडणार आहेत. होय जिल्ह्यातील विद्यार्थी विमानप्रवासाला जाणार आहेत. दिल्लीला. अन् तेही सरकारी खर्चाने. त्याहून विशेष म्हणजे, सरकारी बजेट कमी पडलेच तर स्वत:च्या खिशातून खर्च करू, पण पोरांना विमानात नेऊ, असा निर्धार गुरुजींनी केला आहे.
अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वहीचा कागद फाडायचा अन् विमान करून उडवायचे... हाच चाळा ज्यांच्या बालपणीचा खेळ असतो, ती गरिबांची लेकरं लवकरच खऱ्याखुऱ्या विमानात बसून उडणार आहेत. होय जिल्ह्यातील विद्यार्थी विमानप्रवासाला जाणार आहेत. दिल्लीला. अन् तेही सरकारी खर्चाने. त्याहून विशेष म्हणजे, सरकारी बजेट कमी पडलेच तर स्वत:च्या खिशातून खर्च करू, पण पोरांना विमानात नेऊ, असा निर्धार गुरुजींनी केला आहे.
जिल्हा परिषद शाळेतील खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना ही संधी मिळणार आहे समग्र शिक्षा अभियानातून. यासंदर्भात सोमवारी समग्र शिक्षा अभियान कक्षात जिल्हास्तरीय बैठकही पार पडली. उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.
यंदा समग्र शिक्षातून प्रत्येक जिल्ह्यातील निवडक विद्यार्थ्यांसाठी सरकारी खर्चाने सहलीचे आयोजन केले जात आहे. त्यात जिल्ह्याबाहेर आणि राज्याबाहेर असे सहलीचे दोन प्रकार करण्यात आले आहे. त्यादृष्टीने जिल्हास्तरावरून नियोजन सुरू आहे. जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या सहलीकरीता अकोला, वाशिम, बुलडाणा, चंद्रपूर अशा जिल्ह्यांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. तर राज्याबाहेर काढण्यात येणाऱ्या सहलीकरिता दिल्ली याच नावावर सर्वांचे एकमत झाल्याचे कळते.
या सहलीकरिता जिल्ह्याला समग्र शिक्षातून सव्वाचार लाखांचा निधी मंजूर आहे. त्यापैकी परजिल्हा सहलीकरिता ६५० विद्यार्थ्यांचा खर्च करायचा आहे. तर परराज्यातील सहलीकरिता १०० विद्यार्थ्यांचा खर्च भागवायचा आहे. मात्र दिल्लीच्या सहलीत विमानप्रवास केल्यास या निधीत (प्रती विद्यार्थी ३ हजार) खर्च भागण्याची शक्यता नाही. त्यामुळे अधिकारी, शिक्षकांनी स्वत: काही खर्चाचा भार उचलावा, असे सोमवारच्या बैठकीत सर्वांनी मिळून ठरविले.
प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधणार
दरम्यान दिल्लीच्या सहलीसाठी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात जाण्याचे नियोजन केले जात आहे. शक्यतो, २६ जानेवारीपूर्वी दिल्लीत पोहोचून प्रजासत्ताक दिनाच्या परेडचा आनंद विद्यार्थ्यांना मिळवून देण्याचे प्रयत्न जिल्हास्तरावरून सुरू आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील दोन्ही खासदारांकडून मदत मिळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. दिल्लीतील सरकारी चकाचक शाळा, संसद भवन, राष्ट्रपती भवन पाहण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे.