नगराध्यक्ष पदासाठी सेना-भाजपा अडून

By admin | Published: November 20, 2015 02:53 AM2015-11-20T02:53:54+5:302015-11-20T02:53:54+5:30

नगरपंचायत कळंबच्या त्रिशंकू अवस्थेत दोन पक्ष एकत्र आल्याशिवाय सत्ता स्थापन होणे अशक्य आहे.

For the post of Chief of the Army, the BJP-BJP alliance | नगराध्यक्ष पदासाठी सेना-भाजपा अडून

नगराध्यक्ष पदासाठी सेना-भाजपा अडून

Next

बैठक निष्फळ : दोन पक्ष एकत्र आल्याशिवाय कळंबमध्ये सत्ताप्राप्ती नाही
कळंब : नगरपंचायत कळंबच्या त्रिशंकू अवस्थेत दोन पक्ष एकत्र आल्याशिवाय सत्ता स्थापन होणे अशक्य आहे. नगरपंचायतमध्ये शिवसेना पाच तर भाजपाचे चार नगरसेवक निवडून आले. नैसर्गिक मित्रपक्ष असलेल्या या दोन पक्षांनी एकत्र आल्यासच युतीचा झेंडा फडकल्या जाऊ शकते. परंतु हे दोन्ही पक्ष नगराध्यक्ष पदासाठी अडून बसले आहेत. त्यामुळे नुकतीच झालेली जिल्हा पातळीवरील बोलणीही निष्फळ ठरल्याचेच दिसून येते.
आतापर्यंतच्या ग्रामपंचायत प्रशासनावर काँग्रेसची एकहाती सत्ता होती. केवळ मागील पंचवार्षीक ही ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. यावेळी या प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांना डावलून जनतेने नव्या दमाच्या युवकांवर विश्वास टाकला. त्यामुळे कळंब नगर पंचायतमध्ये शिवसेना व भाजपाने एकत्र येत सत्ता स्थापन करावी, असा जनतेचा कौल आहे. परंतु दोन्ही पक्षांच्या हेकेखोर वृत्तीमुळे युती संदर्भात एका ठराविक निष्कर्षावर चर्चा पोहचलेली नाही. पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, आमदार डॉ.अशोक उईके, आमदार मदन येरावार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे आदी नेत्यांमध्ये युतीच्या संदर्भात नुकतीच चर्चा झाली. या चर्चेत डॉ.अशोक उईके यांनी एक अपक्षासह आपले पाच नगरसेवक असल्याची बाजू मांडली. नगराध्यक्ष व केवळ एक विषय समिती सभापतीचे पद ठेऊन उपनगराध्यक्षांसह सर्व पदे शिवसेनेला देण्याचा फॉर्मुला ठेवण्यात आला. परंतु शिवसेनेने हा फॉर्मुला तत्काळ रिजेक्ट केला. नगराध्यक्ष होईल तर शिवसेनेचाच हा पवित्रा घेण्यात आला. कुठल्याही परिस्थितीत कळंब नगर पंचायतवर शिवसेनेचा भगवा फडकवायचाच, अशी सेनेच्या पदाधिकाऱ्यांची भावना होती. एवढेच नाही तर सलग पाच वर्ष सेनेचाच नगराध्यक्ष राहील, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे नगराध्यक्ष निवडीची २७ तारीख आली असतानाही युतीच्या संदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे कळंबवासी अजुनही शेवटच्या क्षणी कोणाची युती होईल या संभ्रमात आहे.
शैलजा प्रकाश उमरतकर या एकमेव नगरसेवक अपक्ष म्हणून निवडून आल्या. काँग्रेस, शिवसेना व भाजपानेही त्यांच्यावर दावा ठोकला आहे. परंतु त्यांनी आपण सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षासोबत राहणार असल्याचे सांगितले. आपण कोण्या एका पक्षासोबत नसून कुठलेही दोन पक्ष एकत्र येऊन सत्ता मिळविणाऱ्यांसोबत आहो. त्यामुळे आपल्याला कोणीही गृहित धरु नये, असे रोखठोक मत त्यांनी लोकमतशी बोलताना मांडले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: For the post of Chief of the Army, the BJP-BJP alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.