जिल्हाध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये मोर्चेबांधणी
By admin | Published: March 9, 2015 01:41 AM2015-03-09T01:41:28+5:302015-03-09T01:41:28+5:30
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलले, आता जिल्हाध्यक्षही बदलतीलच, असा अंदाज बांधून काँग्रेसमधील
यवतमाळ मुख्यालयाचा आग्रह : भाजप, सेना, राष्ट्रवादीचा हवाला
यवतमाळ : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलले, आता जिल्हाध्यक्षही बदलतीलच, असा अंदाज बांधून काँग्रेसमधील काही नेतेमंडळींनी जिल्हाध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी चालविली आहे. संभाव्य जिल्हाध्यक्ष यवतमाळ मुख्यालयाचा होणार की पुन्हा ग्रामीण भागातील याकडे लक्ष लागले आहे.
काँग्रेसने राज्याची सूत्रे माणिकराव ठाकरे यांच्याकडून काढून घेऊन खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे सोपविली. प्रदेशाध्यक्ष बदलताच यवतमाळ जिल्हा काँग्रेसमध्येही अध्यक्ष बदलाचे वारे वाहू लागले आहे. नवे प्रदेशाध्यक्ष आपली नवी टीम बनविणार की जुन्याच खेळाडूंच्या बळावर पुढचा कारभार चालविणार, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र येथील जिल्हाध्यक्ष अनेक वर्षांपासून असल्याने त्यांना बदलले जाण्याची दाट शक्यता आहे. ही शक्यता पाहता काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष होण्यासाठी अनेक नेत्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. उमरखेड, दिग्रस या तालुक्यांमधून अधिक जोर पाहायला मिळत आहे. गेली काही वर्ष काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद मुख्यालयापासून ११० किलोमीटर दूर ग्रामीण भागात जिल्ह्याच्या एका बाजूला गेले होते. यावेळी मात्र जिल्हाध्यक्ष हा यवतमाळ जिल्हा मुख्यालयी राहणारा असावा, असा सूर काँग्रेसच्या गोटातून ऐकायला मिळत आहे. अध्यक्षपद पुन्हा उमरखेडकडे गेल्यास जुन्याच कारभाराची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तविता ग्रामीण भागात नेतृत्व सोपविण्यास पक्षातूनच विरोध केला जात आहे. काँग्रेसमधीलच एक गट अध्यक्षपद यवतमाळ मुख्यालयी द्यावे म्हणून प्रयत्नरत आहे. त्यासाठी शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादीतील जिल्हाध्यक्षपदाचा हवाला दिला जात आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुखपद अद्याप महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडेच आहे. नवा जिल्हा प्रमुख कोण आणि केव्हा होणार, याची प्रतीक्षा शिवसैनिकांना आहे. भाजपाचेही जिल्हाध्यक्ष यवतमाळचेच आहेत. मात्र त्यांची टर्म मार्चअखेरीस संपणार आहे. त्यांना पुन्हा संधी दिली जाते की नवा चेहरा आणला जातो, याकडे लक्ष लागले आहे. मात्र चेंज झाल्यास भाजपाचा नवा जिल्हाध्यक्ष जिल्हा मुख्यालयाचाच करण्याकडे आमदार मंडळींचा कल असल्याचे सांगितले जाते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षही यवतमाळ शहरातील आहेत. त्यामुळेच काँग्रेसमध्येसुद्धा नवा जिल्हाध्यक्ष यवतमाळ येथील द्यावा, असा आग्रह केला जात आहे. जिल्हा काँग्रेसची जबाबदारी एखाद्या तरुण अभ्यासू माजी आमदाराकडे दिली जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या आमदाराचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठीही चर्चेत होते. मात्र ही संधी हुकल्याने त्यांचे जिल्हाध्यक्ष म्हणून पुनर्वसन केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)
विरोधाची धार वाढविण्यासाठी संघटनावर भर
लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस जिल्ह्यात चारीमुंड्या चित झाली. संघटनेतील साठमारी दूर करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. त्या बदलाचे वारे प्रदेश कमिटीपर्यंत पोहोचले असून आता जिल्हास्तरावरच्या समित्यांमध्येही फेरबदल होत आहे. विरोधी बाकावर बसलेल्या काँग्रेसजणांकडून विरोधाची धार वाढविण्यासाठी संघटनावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी पक्षातीलच सर्वश्रृत आणि नेहमी संपर्कात येणारे नेतृत्व जिल्हाध्यक्षपदी बसावं अशी मनीषा निष्ठावान कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. जिल्हा नियंत्रित करण्यासाठी मुख्यालयी दबदबा असलेल्या व्यक्तीलाच पक्षाची धुरा द्यावी, असाही सूर निघत आहे.