जिल्हाध्यक्षपदासाठी काँग्रेसचा मुंबईत खल
By admin | Published: March 26, 2016 02:11 AM2016-03-26T02:11:46+5:302016-03-26T02:11:46+5:30
अनेक दिवसांपासून रखडलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदासाठी आता मुंबईत खल सुरू झाला असून एप्रिल महिन्यात ...
एप्रिलमध्ये घोषणा : प्रदेशाध्यक्षांनी घेतल्या मुलाखती
यवतमाळ : अनेक दिवसांपासून रखडलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदासाठी आता मुंबईत खल सुरू झाला असून एप्रिल महिन्यात नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. २१ मार्च रोजी मुंबईच्या गांधी भवनात जिल्ह्यातील तब्बल १७ इच्छुकांनी मुलाखती दिल्यात यात माजी मंत्री, माजी आमदारांसह पक्षासाठी दीर्घकाळ सेवा देणाऱ्या सदस्यांचाही समावेश आहे. या उपरही पक्षश्रेष्ठींचा शोध संपला नसून मार्चअखेरपर्यंत इच्छुकांना संधी दिली जाणार आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी सोमवारी मुंबईत जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या; त्यात माजी मंत्री शिवाजीराव मोघे, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रा.वसंतराव पुरके, माजी मंत्री संजय देशमुख, विद्यमान जिल्हाध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार विजय खडसे, नंदिनी पारवेकर, विजयाताई धोटे यांच्यासह १७ जणांचा समावेश आहे. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी प्रत्येकांशी १० ते १५ मिनिट पक्षबांधणी या विषयावर चर्चा केली. जिल्ह्यातील पक्षस्थितीबाबत इच्छुकांना विचारण्यात आले. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कोणत्या उपाययोजना हव्या आहेत, यापूर्वी कोणत्या चुका झाल्या अशी विचारणा प्रदेशाध्यक्षांकडून करण्यात आल्याची माहिती आहे.
समोरासमोर आरोप-प्रत्यारोप म्हणून प्रत्येकाला स्वतंत्र बोलवून स्थिती जाणून घेतली. प्रत्येक इच्छुकाने पक्षाने दिलेली जबाबदारी आपण स्वीकारण्यास आपण कसे सक्षम आहो, हे ठासून सांगितले. अध्यक्ष निवडण्यासाठी कोणाला मत मांडायचे असल्यास मार्चअखेरपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्षांकडून करण्यात आले.
नागपूर येथे ११ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाबाबतही जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. या कार्यक्रमादरम्यान सातत्याने नागपूर दौरा होत राहणार आहे. याच काळात इतरही ज्येष्ठ काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे प्रदेशाध्यक्षांनी यावेळी स्पष्ट केले. काँग्रेस जिल्हाध्यक्षाची घोषणा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होईल, असे मुलाखतीस गेलेल्या इच्छुकांनी सांगितले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)