पोस्टल मैदानातील दुकाने धनदांडग्यांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 10:24 PM2019-08-20T22:24:20+5:302019-08-20T22:25:15+5:30
स्थानिक पोस्टल मैदानाच्या विकासकामात तेथे २१ दुकानगाळे काढण्यात आले होेते. बांधकामाच्या परवानगीवरून हे दुकानगाळे वादात अडकले होते. महसूल विभागाने बांधकाम विभागाच्या मदतीने पोस्टल मैदानात विकासकामे केली. तब्बल सहा वर्षांपासून येथील गाळ्यांची लिलाव प्रक्रिया रखडली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्थानिक पोस्टल मैदानाच्या विकासकामात तेथे २१ दुकानगाळे काढण्यात आले होेते. बांधकामाच्या परवानगीवरून हे दुकानगाळे वादात अडकले होते. महसूल विभागाने बांधकाम विभागाच्या मदतीने पोस्टल मैदानात विकासकामे केली. तब्बल सहा वर्षांपासून येथील गाळ्यांची लिलाव प्रक्रिया रखडली होती. आता ई-लिलाव पद्धतीने हे गाळे वितरित केले आहे. मात्र यामध्ये मूळ उद्देशाला हरताळ फासला आहे. अनेक धनदांडग्यांनी या गाळ्यांवर ताबा मिळविला आहे.
पोस्टल मैदानात असलेल्या दुकानगाळ्यांचा लिलाव नगरपरिषदेने करावा, असा प्रस्ताव आला होता. मात्र हे बांधकामच विनापरवानगी असल्याचा प्रकार पालिकेत चर्चेला आला. हस्तांतरणाची प्रक्रिया अर्ध्यावर रखडली. यावरून अनेक दिवसांचा अवधी गेल्यानंतर महसूल विभागाने हे गाळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या ताब्यात दिले. त्यासाठी ई-लिलाव करण्याचे निर्देश देण्यात आले. ई-लिलाव करताना ही प्रक्रिया अतिशय गोपनीय पद्धतीने पार पाडली. मुळात पोस्टल मैदानावरील दुकानगाळे बेरोजगारांना, रस्त्यावरील व्यावसायिकांना देण्याचा मूळ उद्देश होता. तत्कालीन आमदार नीलेश पारवेकर यांनी हा दृष्टिकोन ठेवून पोस्टल मैदानाचे विकासकाम केले होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेतील समितीच्या अधिनस्थ ही प्रक्रिया पार पाडण्यात आली. जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी जिल्ह्याच्या अधिकृत साईडवरून ई-लिलाव केला. या लिलाव प्रक्रियेची जाहिरात मात्र सर्वांपर्यंत जाणार नाही, अशाच पद्धतीने लोकल दैनिकात प्रसिद्ध केल्याचा आरोप होत आहे. २१ गाळ्यांपैकी चार गाळे एकाच व्यक्तीने घेतले आहे. तर इतर दोघांनी प्रत्येकी दोन गाळे स्वत:कडे ठेवले आहे. विविध फर्मच्या नावाने गाळे घेणारी व्यक्ती एकच आहे. यामुळे बेरोजगार व रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे. काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही हे गाळे बळकावले आहे.
मुळात सर्वसामान्यांना शक्य होईल, अशी अनामत रक्कम ठेवून गाळ्याचा ई-लिलाव होणे अपेक्षित होते. मात्र नियमाच्या आडून सोयीच्या पद्धतीने गाळ्यांचे वाटप झाल्याचा आरोप होत आहे. २१ गाळ्यांपैकी १ व २ अशा इमारतीमध्ये एकाच व्यक्तीला दोन ते चार गाळे देण्यात आले. एका व्यक्तीला एक गाळे असा निकष लावला असता तर सामान्यांनाही या प्रक्रियेत भाग घेणे किंवा स्पर्धा करणे शक्य झाले असते. आता मात्र धनदांडग्यांचा या गाळ्यांवर ताबा आला आहे.
ई-लिलाव पद्धतीने गाळ्यांचे वाटप केले आहे. आयुक्तांकडून आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून प्रक्रिया केली आहे. सर्वाधिक दर देणाऱ्यांचीच निवड झाली आहे.
- घनश्याम राठोड, जिल्हा क्रीडा अधिकारी, यवतमाळ