सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला मरणोत्तर न्याय; बँक ऑफ इंडियाला दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 03:04 PM2020-08-14T15:04:33+5:302020-08-14T15:05:08+5:30
बँक खात्यातून ५० हजार रुपये उडविल्याच्या प्रकरणात सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला मरणोपरांत न्याय मिळाला. यवतमाळ जिल्हा ग्राहक न्यायालयाने या प्रकरणात बँक ऑफ इंडियाला दणका दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बँक खात्यातून ५० हजार रुपये उडविल्याच्या प्रकरणात सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला मरणोपरांत न्याय मिळाला. यवतमाळ जिल्हा ग्राहकन्यायालयाने या प्रकरणात बँक ऑफ इंडियाला दणका दिला. व्याज आणि शारीरिक व मानसिक त्रासापोटी १३ हजार रुपये देण्याचा आदेश मंचाने दिला आहे. मंचचे अध्यक्ष नंदकुमार वाघमारे व सदस्य हेमराज ठाकूर यांच्या उपस्थितीत हे प्रकरण चालले.
यवतमाळचे श्रीनिवास बळवंतराव देशमुख यांचे बँक ऑफ इंडियाच्या यवतमाळ येथील दत्त चौक शाखेत खाते होते. एटीएम असले तरी ते स्लीपद्वारेच पैसे काढत होते. या खात्यातून ५० हजार रुपये काढल्याची बाब पासबुकवर नोंदी घेतल्यानंतर स्पष्ट झाली. २० व २१ फेबु्रवारी २०१५ रोजी या रकमा काढल्या गेल्या. फसवणूक झाल्याची तक्रार त्यांनी वडगाव रोड (अवधुतवाडी) पोलिसात केली.
उल्हासनगरच्या एटीएममधून ही रक्कम काढण्यात आली. देशमुख यांचा आणि पैसे काढल्याचा एटीएम कार्ड क्रमांक वेगवेगळा असल्याचे सिध्द झाले. सततच्या पाठपुराव्यानंतर देशमुख यांच्या खात्यात बँकेने ५० हजार रुपये जमा केले. या रकमेचा वाद संपुष्टात आला असला तरी, करावा लागलेला पत्रव्यवहार, झालेला शारीरिक व मानसिक त्रास यामुळे हे प्रकरण जिल्हा ग्राहकन्यायालयात दाखल करण्यात आले.
फेब्रुवारी २०१६ मध्ये तक्रार दाखल करण्यात आली. श्रीनिवास देशमुख यांच्यासह त्यांचे वारसदार अभिजित श्रीनिवास देशमुख, अनिकेत श्रीनिवास देशमुख, सोनल श्रीनिवास देशमुख रा.मुंबई हे तक्रारकर्ते होते. ३ फेबु्रवारी २०१८ रोजी श्रीनिवास देशमुख यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर दोन वर्षे या प्रकरणात ग्राहक न्यायालयात कार्यवाही चालली. चार वर्षे दोन महिने १३ दिवसाने या प्रकरणाचा निकाल लागला.
बँकेच्या पाठपुराव्याने रक्कम परत
श्रीनिवास देशमुख यांच्या खात्यातून काढण्यात आलेली रक्कम बँकेने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करून परत मिळवून दिली. जमा झालेली रक्कम देशमुख यांनी कुठलाही आक्षेप अथवा निषेध न नोंदविता खात्यातून काढून घेतली. त्यामुळे हे प्रकरण खारीज करावे, अशी बाजू बँकेने जिल्हा ग्राहक न्यायालयात मांडली होती.