पूस धरणाची पाणी पातळी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 11:36 PM2018-04-28T23:36:35+5:302018-04-28T23:36:35+5:30

दिवसेंदिवस ऊन वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनही वाढले आहे. यामुळे पूस धरणातील पाणी पातळीत कमालीची घट होत आहे. सध्या पूस धरणात केवळ १० टक्के जलसाठा शिल्लक आहे.

Pous dam water level decreased | पूस धरणाची पाणी पातळी घटली

पूस धरणाची पाणी पातळी घटली

Next
ठळक मुद्देबाष्पीभवनाचा परिणाम : पाणी वाटपात खोळंबा, पुसदचे नागरिक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : दिवसेंदिवस ऊन वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनही वाढले आहे. यामुळे पूस धरणातील पाणी पातळीत कमालीची घट होत आहे. सध्या पूस धरणात केवळ १० टक्के जलसाठा शिल्लक आहे.
सध्या विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. तापमान ४५ डीग्री अंश सेल्सीअसवर पोहोचल्याने अंगाची लाही-लाही होत आहे. पुसद शहरासाठी जीवनदायीनी असलेल्या पूस धरणात सध्या केवळ १० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. सध्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन प्रचंड होत आहे. वाढत्या उन्हामुळे प्रतिदिन ४० ते ४५ सेमी पाण्याचे बाप्पीभवन होत आहे. या बाष्पीभवनामुळे धरणातील पाण्याची पातळी ४५ सेमीने खाली गेली आहे. नॉर्मल स्थितीत हे प्रमाण २५ सेमीच्या दरम्यान असते. बाष्पीभवनाच्या परिणामावर कसलाच उपाय व तोडगा नसल्याने प्रत्येक उन्हाळ्यात ही नैसर्गिक घट सहन करावी लागते.
हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांनी पुसद तालुका सुजलाम सुफलाम व्हावा, या उदात्त हेतूने पुसदपासून १७ किलोमीटर अंतरावर वनवार्ला गावाजवळ तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते २६ डिसेंबर १९६४ रोजी पूस धरणाची कोनशीला बसविली होती. अध्यक्षस्थानी तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक होते. सात वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर पुसद धरण पूर्ण झाले. १९ नोव्हेंबर १९७१ रोजी त्याचे लोकार्पण झाले. त्यावेळी शंकरराव चव्हाण, आबासाहेब पारवेकर उपस्थित होते. नाईक साहेबांच्या दूर दृष्टीमुळे परिसर सुजलम सुफलाम झाला. मात्र नंतरच्या काळात प्रशासकीय स्तरावर भरीव काम झालेच नाही.
शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची आहे. २९ वार्डातील नागरिकांना पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक तयार करण्यात आले. सध्या तीन दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. मात्र वेळापत्रकानुसार पाणी पुरवठा करताना त्या वार्डातील अनेक भागात पाणी पुरवठा होतच नाही. २६ एप्रिल प्रभाग ७ मधील शंकरनगर, जाजू कॉलनी, डुब्बेवार ले-आऊट, रामनगर, व्यंकटेशनगर, येरावार ले-आऊट, पापीनवार ले-आऊट या भागात पाणी पोहोचलेच नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागला.
याबाबत पाणी पुरवठा सभापतींना विचारणा केली असता, त्यांनी जाजू हॉस्पीटलजवळील पाइपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पाणी पुरवठा झाला नाही, असे सांगितले. हा प्रभाग ७ चा प्रश्न नाही, तर शहरातील अनेक वार्डात असा प्रकार घडत आहे. विशेष म्हणजे काही भागात सकाळ-सायंकाळ असे दोनदा पाणी पोहोचत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. पालिका प्रशासनाने याची वेळीच दखल घेतली नाही, तर जनतेच्या उद्रेकाला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वाढत्या तापमानामुळे ३0 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
पूस धरणात एप्रिल महिन्याच्या शेवटी केवळ १० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. बाप्पीभवन ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यावर उपाययोजना नाही. मात्र नगरपरिषदेच्या पाणी वितरण व नियोजनातही अनेक त्रुटी आहे. त्यामुळेच शहरवासीयांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. उन्हाळ्यात नागरिकांकडून पाण्याची मागणी वाढते. तसेच पूस धरणाच्या पाणीसाठ्याची पातळी झपाट्याने कमी होते. सध्या पुसद शहराची तहान पूस धरण भागवते, हे वास्तव आहे. मात्र ही तहान परिपूर्ण भागत नाही, हेसुद्धा वास्तव आहे. दरवर्षी एकूण जलसाठ्यापैकी ५० टक्क्यांवरच्या आसपास पाणी बाष्पीभवन होऊन वाया जाते. आजपर्यंत बाष्पीभवन रोखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होताना दिसले नाही. यासाठी शासन, प्रशासन आणि स्थानिक सामाजिक संस्था, संघटनांनी पुढाकार घेऊन बाष्पीभवन रोखण्यासाठी प्रयत्न केल्यास ३० टक्क्यापर्यंत घट शक्य असल्याचे सोंगितले जाते.

Web Title: Pous dam water level decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.