पावर ग्रीड कंपनीला आयोगाचा ‘शॉक’
By Admin | Published: April 16, 2017 01:13 AM2017-04-16T01:13:13+5:302017-04-16T01:13:13+5:30
तालुक्यात पावर ग्रीड कंपनीच्या वतीने मनमानी पद्धतीने उभारल्या जाणाऱ्या टॉवरच्या कामाला दिल्ली येथील अनुसूचित जमाती आयोगाने चाप बसविला आहे.
शेतकऱ्यांना दिलासा : अनुसूचित जमाती आयोग
महागाव : तालुक्यात पावर ग्रीड कंपनीच्या वतीने मनमानी पद्धतीने उभारल्या जाणाऱ्या टॉवरच्या कामाला दिल्ली येथील अनुसूचित जमाती आयोगाने चाप बसविला आहे. कंपनीविरुद्ध आयोगाचा आदेश धडकल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांच्या शेतात विनापरवानगी टॉवर उभारणीचे काम गेल्या कित्येक दिवसांपासून तालुक्यासह जिल्ह्यात सुरू आहे. अपवाद वगळता शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. यासंदर्भात अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोगाकडे धाव घेतली. आयोगाचे सदस्य अशोककुमार यांनी दखल घेत कंपनीला ३० दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. या नव्या आदेशामुळे कंपनीच्या मनमानी कारभाराला चाप बसला आहे.
जिल्हाभरात कंपनीविरुद्ध शेतकरी एकवटले असून उटी येथील प्रशांत गावंडे यांच्या मार्गदर्शनात लढा उभारला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कंपनीविरुद्ध मोठे आंदोलन उभारण्याची तयारी दर्शविली आहे. (शहर प्रतिनिधी)