उमरखेड तालुक्यात वीज समस्या कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:30 AM2021-05-28T04:30:23+5:302021-05-28T04:30:23+5:30
ब्राम्हणगाव उपकेंद्राअंतर्गत असलेल्या गावांमध्ये दिवसभर दर अर्ध्या तासाला विजेचा लपंडाव सुरू असतो. यामुळे कडाक्याच्या उकाड्याने त्रस्त असलेले नागरिक वैतागले ...
ब्राम्हणगाव उपकेंद्राअंतर्गत असलेल्या गावांमध्ये दिवसभर दर अर्ध्या तासाला विजेचा लपंडाव सुरू असतो. यामुळे कडाक्याच्या उकाड्याने त्रस्त असलेले नागरिक वैतागले आहेत. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे. लॉकडाऊन काळात आपापल्या घरात बसून कोरोनापासून सुरक्षितता बाळगणाऱ्या गावकऱ्यांना दिवसभरात दर अर्ध्या तासाला वीज पुरवठा खंडित होत असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मुले तसेच वृद्ध व्यक्ती यामुळे कासाविस होत आहेत.
ब्राम्हणगाव येथे उपकेंद्राअंतर्गत स्वतंत्र फिडर आहे. मात्र, ते सुरू करण्याबाबत सहाय्यक अभियंत्यांना कुठलेही स्वारस्य नाही. एखाद्या ठिकाणी बिघाड असताना सबस्टेशनअंतर्गत असलेली सर्वच गावे अंधारात ठेवली जातात. सबस्टेशनला लाईनमन, कर्मचारी नेहमी गैरहजर असतात. सार्वजनिक सुविधांबाबत उदासीनता बाळगली जात आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये वीज वितरणच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे.
बॉक्स
अनेक गावांमध्ये खंडित पुरवठा
विजेच्या लपंडावाला नागरिक वैतागले असताना, या सबस्टेशनअंतर्गत असलेल्या सिंदगी, माणकेश्वर, कोपरा, बोरी, चातारी, उंचवडद, धानोरा, सोईट, महागाव, गांजेगाव, सावळेश्वर आदी गावचे नागरिकही नेहमीच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे बेजार आहेत. सहायक अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.