नियमित रिडींग न घेताच भरमसाठ विद्युत बिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2016 02:21 AM2016-08-12T02:21:31+5:302016-08-12T02:21:31+5:30
नियमीत रिडींग न घेताच विद्युत ग्राहकांना सरासरी भरमसाठ बिले पाठविण्यात येत असल्याने विद्युत ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.
पांढरकवडातील ग्राहकांमध्ये असंतोष : युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
पांढरकवडा : नियमीत रिडींग न घेताच विद्युत ग्राहकांना सरासरी भरमसाठ बिले पाठविण्यात येत असल्याने विद्युत ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. महावितरण कंपनीतर्फे नियमीत मीटर रिडींग घेऊन ग्राहकांना बिल पाठविण्यात यावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे संघटक जितेंद्र शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्ट मंडळाने कार्यकारी अभियंता उदय कोंडावार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. या मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.
ग्रामीण भागात विद्युत पंपाच्या तसेच घरगुती वापराच्या मीटरचे रिडींग न घेताच अवास्तव रकमेची बिले पाठविण्यात येत असल्याचा आरोप युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच विविध गावातील सरपंचांनी या निवेदनातून केला आहे. आदिवासी बहुल असलेल्या तालुका हा आत्महत्याग्रस्त तालुका असून शेतकरी वर्ग कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आहे. अशा विपरीत परिस्थितीत भरमसाठ बिले येत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. विद्युत वितरण कंपनीने नियमीतपणे विद्युत मीटरचे रिडींग घेऊन बिलांचे वितरण करण्यात यावे, अशी मागणी विद्युत वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता कोंडावार यांना प्रत्यक्ष भेटून तालुका काँग्रेसने केली आहे.
यावेळी जितेंद्र मोघे यांच्यासह तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिनू नालमवार, भाडउमरीचे सरपंच शंकर सोयाम, महेंद्र भोयर, सोनू उप्पलवार, वासुदेव सिडाम, संजय रेड्डी, प्रेम राठोड, रामदास राठोड, नीलेश चव्हाण, शंकर कुमरे, कुणाल जामकर, अमित उप्पलवार, महादेव सुरपाम, हर्षपाल खाडे, सुखीयान शेख आदी उपस्थित होते. ज्या विद्युत ग्राहकांना जास्त रकमेची सरासरी बिले आली असतील, त्यांनी आपले विद्युत बिल घेऊन कार्यालयात आल्यास बिलामध्ये त्वरित दुरूस्ती करून देण्यात येईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता उदय कोंडावार यांनी दिली. ग्राहकांना आलेली सरासरी बिले रिडींगनुसारच दुरूस्ती करून देण्यात येईल. कोणत्याही ग्राहकाला भूर्दंड पडणार नसल्याचेही यावेळी कोंडावार म्हणाले. (तालुका प्रतिनिधी)