दिग्रसच्या सूर्यकोटी मंडळातर्फे प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 10:32 PM2018-09-22T22:32:07+5:302018-09-22T22:32:52+5:30

येथील मोठा मारोती मंदिर परिसरातील सूर्य कोटी गणेश मंडळाने सामाजिक प्रबोधनाची परंपरा जोपासत यावर्षी भाविकांना तालुक्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याची विनवणी केली आहे.

Pragodan by Suryakoti Mandal of Digras | दिग्रसच्या सूर्यकोटी मंडळातर्फे प्रबोधन

दिग्रसच्या सूर्यकोटी मंडळातर्फे प्रबोधन

Next
ठळक मुद्देपूरग्रस्तांना मदतीची विनवणी : विविध छायाचित्रातून उभा केला वास्तववादी पट

लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : येथील मोठा मारोती मंदिर परिसरातील सूर्य कोटी गणेश मंडळाने सामाजिक प्रबोधनाची परंपरा जोपासत यावर्षी भाविकांना तालुक्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याची विनवणी केली आहे.
आॅगस्टमध्ये मुसळधार पावसाने शहराच्या मध्यवस्तीतून जाणाऱ्या धावंडा नदीला महापूर आला. नदी कोपल्याने शहरात पुराचे पाणी शिरले. यामुळे हजारो घरांचे नुकसान झाले, शेकडोंचे संसार उघड्यावर आले. पालिकेच्या हलगर्जीपणामुळे १३ वर्षांपूर्वी ९ जुलै २००५ रोजी नांदगव्हाण धरणाची सुरक्षा भिंत तुटल्याने धावंडा नदीला महापूर आला होता. त्यात १४ निष्पापांचे बळी गेले होते. घरातील चीजवस्तू, पैसा-अडका वाहून गेला होता. बायका-मुलांचे जीव वाचविण्यासाठी अनेक कुटुंब प्रमुखांनी जीवाचा आटापिटा केला होता. ज्यांना जमले नाही, त्यांच्या डोळ्यासमोर काळजाचे तुकडे वाहून गेले. त्यांच्या किंकाळ्या आजही कानात घुमत आहे. १३ वर्षे उलटूनही त्या आठवणींमधून दिग्रसकर बाहेर येऊ शकलेले नाही.
१३ वर्षांपासून त्यांच्या घरकुलांचे बांधकाम सुरू आहे. मात्र ते अद्याप पूर्ण झालेले नाही. ते तेव्हाच पूर्ण झाले असते, तर आता धावंडेला झालेल्या नुकसानीपासून दिग्रसकरांची सुटका झाली असती. यातील भ्रष्टाचाराची चौकशी करून लवकरात लवकर घरकूल बांधून देत आमचे पुनर्वसन करावे, असा पूरग्रस्तांमधून व्यक्त होणारा सूर मंडळाने नागरिकांसमोरच मांडला.
शब्द दर्शवतात पूरग्रस्तांच्या व्यथा
धावंडा कोपल्याने हजारोंचा संसार उघड्यावर आला. ९ जुलैच्या त्या काळ रात्रीची आठवण आजही असह्य करून सोडते. आता मलमपट्टी नको, तर कायम उपाययोजना करा मानवतेची, हाक मदतीची-पूरग्रस्तांचे संसार सावरण्यास मदत करा, मदतीसाठी पुढे आलेला एक हात-लाख मोलाच्या सल्ल्यापेक्षा श्रेष्ठ, जो इतरांचे दु:ख समजून घेतो-तोच खरा सज्जन समजावा, आम्हा पूरग्रस्तांना-घर देता घर, आम्ही मेल्यानंतरच देणार का कायमचे घर, अशा शब्दांतून मंडळाने पूरग्रस्तांची व्यथा मांडली आहे. सूर्य कोटी गणेश मंडळाने पूरग्रस्तांचे हाल दिग्रसकरांसमोर मांडून एका महत्त्वाच्या समस्येला नव्याने वाचा फोडल्याबद्दल मंडळाचे कौतुक होत आहे.

Web Title: Pragodan by Suryakoti Mandal of Digras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.