प्रहार जनशक्ती पक्षाच्या नगरसेवकाची चाकूने भोसकून हत्या; तीन भावांना अटक
By सुरेंद्र राऊत | Published: March 13, 2023 04:55 PM2023-03-13T16:55:12+5:302023-03-13T16:56:40+5:30
रेतीच्या पैशाचा वादातून घटना घडल्याची माहिती
यवतमाळ : बाभूळगाव नगरपंचायतीतील प्रहार जनशक्ती पक्ष नगरसेवकाची तिघांनी चाकूने भोसकून हत्या केली. ही घटना बाभूळगाव तालुक्यातील मिटनापूर येथे रविवारी रात्री १२ वाजता दरम्यान घडली. रेतीच्या पैशाचा वाद असल्याचे कारण पोलिसांकडून सांगितले जात आहे. या गुन्ह्यात मिटनापूरमधील तीन भावांना पोलिसांनी रात्रीच अटक केली.
अनिकेत विलास गावंडे (२७) रा. नेताजी चौक आठवडी बाजार बाभूळगाव असे मृत नगरसेवकाचे नाव आहे. सादिक उर्फ सद्दू मुला सलीम मुला, समीर उर्फ गोलू मुला सलीम मुला, आबीद उर्फ सोनू मुला सलीम मुला असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रविवारी रात्री रेतीचे पैसे घेण्यासाठी मृतक अनिकेत गावंडेचा भाऊ शुभम गावंडे मिटनापूर येथे पोहोचला. त्यावेळी आरोपींनी पैसे देण्यास नकार दिला. ही बाब शुभमने अनिकेतला सांगितली. त्यानंतर अनिकेत त्याचा मित्र सौरभ कोल्हे याला घेऊन मिटनापूर येथे गेला. त्या ठिकाणी अनिकेतचा आरोपींशी वाद झाला.
अनिकेतने आरोपींना थापडांनी मारहाण केली. यावरून चिडलेल्या तीनही भावंडांनी धारदार चाकूने अनिकेतवर सपासप वार केले. त्याच्या छातीवर, पोटावर, मानेवर, पाठीवर भोसकण्यात आले. आरोपींच्या तावडीतून अनिकेतची सुटका करीत त्याला जखमी अवस्थेत सौरभ व शुभमने बाभूळगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगून त्याला यवतमाळ येथे हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर बाभूळगाव पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा पथकाने तत्काळ आरोपींचा शोध घेऊन तिघांनाही अटक केली. या प्रकरणात अनिकेतचा भाऊ शुभम विलास गावंडे याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
सात हजारांसाठी झाला वाद
बाभूळगाव तालुका हा रेती तस्करांचे कॅपिटल बनले आहे. यातूनच त्या भागात संघटित गुन्हेगारी उदयास आली आहे. अनिकेत गावंडे हा कधी काळी कुख्यात अक्षय राठोडसोबत कार्यरत होता. नंतर अनिकेतने स्वत:चे स्वतंत्र नेटवर्क उभे केले. अर्थात यासाठी रेती उत्खननातूनच पैसा उपलब्ध होत होता. रेतीच्याच पैशासाठी अनिकेतचा आरोपींसोबत वाद झाला. सात हजार रुपयांची रक्कम घेण्याकरिता तो गेला अन् त्याचाच गेम झाला.