घाटंजीच्या सूरजने पसरविला प्रकाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 09:55 PM2018-07-09T21:55:30+5:302018-07-09T21:56:06+5:30
येथील सूरज अशोक हेमके या साधारण कुटुंबातील युवकाने आतापर्यंत अनेकांच्या आयुष्यात प्रकाश पसरविण्याचे काम केले आहे.
विठ्ठल कांबळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : येथील सूरज अशोक हेमके या साधारण कुटुंबातील युवकाने आतापर्यंत अनेकांच्या आयुष्यात प्रकाश पसरविण्याचे काम केले आहे.
सूरजचे वडील अशोक हेमके ब्रेड विक्रीचा व्यवसाय करतात. मात्र सूरजला सामाजिक संवेदनांची जाणीव आहे. त्यामुळे त्याने आतापर्यंत तब्बल २८ वेळा रक्तदान केले आहे. त्याने जवळपास १५० मित्रांचा गु्रप तयार केला. हा ग्रुपही रक्तदानात अग्रेसर असतो. यामुळे अपघातातील रुग्ण, सिकलसेलचे रुग्ण यांना जीवदान मिळाले. फुटपाथवरील सुमारे ६० गरिबांना सूरजने आपल्या ग्रुपच्या माध्यमातून वस्त्र पुरविले आहे. विदर्भातील जवळपास नऊ जिल्ह्यातील रेल्वे स्टेशन, बसस्थानक परिसरात उघड्यावर झोपणाऱ्यांना ब्लँकेटचे वाटप केले आहे.
गेल्या एक वर्षापासून सूरज केवळ एकदाच भोजन करतो. अनेक रुग्णांना मात्र तो मोफत भोजन पुरवितो. आतापर्यंत त्याने आई, वडील नसलेल्या तसेच हालाखीची आर्थिक परिस्थिती असलेल्या २२ तरुण-तरुणींचे शुभविवाह लावून दिले आहे. त्यात वधू-वरांच्या कापडांसह भोजनाचा खर्चही स्वत:हून केला आहे. कुठलेही रक्ताचे नाते नसताना सूरज माणुसकी विसरत चाललेल्या जगात सामाजिक संवेदना जोपासत आहे. सूरज व त्याचा मित्र परिवार अनेक वृद्धांची देखभाल करून सेवा करतात.
या कामात त्याला विलास पवार, जम्मू कुरेशी, शाहरूख पठाण, रवी मडावी, राजू मडावी, सागर मोहुर्ले, राजू गावंडे, प्रशांत भोयर, राहुल गायकवाड, इमरान शेख, अजय भोजवार, सुशांत निवल, राजू राठोड, अवी भोयर, शोएब खान, उमेश धुर्वे, विशाल डंभारे, सिंधू शिरपुरे, रवी भोयर, बहिणाबाई भोयर, ममता मोहिजे, सिंधू दरणे, ताई अंबुलवार आदींचे सहकार्य लाभते.
अनेकांसाठी ठरला आशेचा किरण
सूरजचे हे कार्य अनेकांसाठी आशेचा किरण ठरले आहे. आधुनिक काळात शेजाऱ्यांचीही कुणी विचारपूस करीत नाही. अशावेळी सूरज मात्र ओळखपाळख नसताना, रक्ताचे नाते नसताना अनेकांची आपल्या परीने सेवा करीत आहे. त्यामुळेच सूरज अनेकांच्या जीवनात प्रकाश पसरवित आहे.