डॉक्टरांच्या शोधात चिमुकल्याने सोडले प्राण
By admin | Published: July 23, 2014 12:11 AM2014-07-23T00:11:34+5:302014-07-23T00:11:34+5:30
मध्यरात्री १२ वाजताची वेळ. पावसाची रिपरिप. किर्रर्र अंधार. आजारी बाळाला घेऊन डॉक्टरांचा शोध. आर्त हाक देऊनही मातेचा आवाज डॉक्टरांच्या कानावर गेलाच नाही. अखेर शासकीय रुग्णालय गाठले.
‘सेवा’ ऐरणीवर : डॉक्टरांच्या कानावर माऊलीची आर्त हाक पोहोचलीच नाही
किशोर वंजारी ल्ल नेर
मध्यरात्री १२ वाजताची वेळ. पावसाची रिपरिप. किर्रर्र अंधार. आजारी बाळाला घेऊन डॉक्टरांचा शोध. आर्त हाक देऊनही मातेचा आवाज डॉक्टरांच्या कानावर गेलाच नाही. अखेर शासकीय रुग्णालय गाठले. परंतु तोपर्यंत चिमुकल्यावर काळाने झडप घातली होती. किर्रर अंधारात मातेचा टाहो अनेकांचे हृदय हेलावून गेला. नेर येथे घडलेल्या घटनेने डॉक्टरांची ‘सेवा’ ऐरणीवर आली.
नेर येथील फुकटनगरात दिनेश कोहळे अंध गृहस्थ राहतात. शहरात भीक मागून चरितार्थ चालवितात. त्यांंची मुलगी आपल्या चिमुकल्या बाळासह अठराविश्व दारिद्र्य असलेल्या झोपडीत राहते. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास बाळाची अचानक प्रकृती बिघडली. डॉक्टरांकडे जाण्याची तयारी झाली. बाळाला घेऊन ही माता सैरावैरा शहरात निघाली. किर्रर्र अंधार चिरत ती खासगी दवाखान्यांचे दार ठोठावू लागली. परंतु कुणीही तिची हार्तहाक ऐकली नाही. या दवाखान्यातून त्या दवाखान्यात जात होती. मात्र कुणीही उपचारासाठी प्रतिसाद देत नव्हते. दरम्यान १२.३० च्या सुमारास ती चिंतामणी चौकात आली. एका स्थानिक तरुणाला तिने आपबिती ऐकविली. त्या तरुणाच्या मदतीने बाळासह अगतिक माता शासकीय रुग्णालयात पोहोचली. मोठ्या आशेने रुग्णालयाच्या पायऱ्या चढली. डॉक्टरांनी बाळाची तपासणी सुरू केली आणि घात झाला.
दरम्यानच्या काळात कधी तरी या बाळाने अखेरचा श्वास घेतला. मातेला बाळाचा मृत्यू झाल्याचे सांगताच तिने किंकाळी फोडली. तिचा हा टाहो अनेकांच्या हृदयाला पाझर फोडणारा होता. कदाचित एखाद्या डॉक्टराने आपला दरवाजा उघडला असता तर बाळाचा मृत्यू झालाच नसता. शासकीय रुग्णालयातील डॉ. शारिक इकबाल यांनी या बालकाचा मृत्यू दूध कुशीत अडकल्याने आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने झाल्याचे सांगितले. केवळ वेळेवर उपचार न मिळाल्याने एका चिमुकल्याला प्राण गमवावा लागला.