मानधनाच्या प्रतीक्षेत ३४ निराधारांनी सोडले प्राण
By admin | Published: July 23, 2014 12:14 AM2014-07-23T00:14:35+5:302014-07-23T00:14:35+5:30
निराधार योेजनेच्या मानधनासाठी उपोषण, आंदोलन, पदयात्रा आदी करूनही पदरात काहीच पडले नाही. दरम्यानच्या काळात ३३ वृद्ध निराधार लाभार्थ्यांनी मानधनाच्या प्रतीक्षेत प्राण सोडला.
उपेक्षा कायम : महागाव तालुक्यातील निराधार आंदोलन करूनही थकले
महागाव : निराधार योेजनेच्या मानधनासाठी उपोषण, आंदोलन, पदयात्रा आदी करूनही पदरात काहीच पडले नाही. दरम्यानच्या काळात ३३ वृद्ध निराधार लाभार्थ्यांनी मानधनाच्या प्रतीक्षेत प्राण सोडला. मात्र अद्यापही प्रशासनाला जाग आली नाही. निराधार मंडळी लाभासाठी तहसीलचे उंबरठे मात्र कायम झिजवित आहे.
केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेचा लाभ मिळतो. महागाव तालुक्यातील शेकडो वृद्ध निराधारांना लाभ मिळत होता. मात्र २०११ मध्ये तालुक्यातील तीन हजार लाभार्थी या योजनेतून अचानक बाद झाले. एक रुपयाही अनुदान मिळाले नाही. अनुदानासाठी दररोज तहसील कार्यालयावर वृद्ध निराधार धडकत आहे. या निराधारांचा प्रश्न घेऊन पंचायत समितीचे माजी सभापती डी.बी. नाईक, जगदीश नरवाडे यांनी वारंवार आंदोलने केली. गेल्या दोन महिन्यापूर्वी तर प्रदीर्घ लढा देण्यात आला. तहसील कार्यालयासमोर प्रश्न सुटत नसल्याने आंदोलनकर्ते पदयात्रा करीत उमरखेडच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकले. मात्र उपयोग झाला नाही. दरम्यान किसान सभेचे पॉलिटब्युरो सीताराम येचुरी यांनी थेट उपजिल्हाधिकारी इंद्रसेन तिटकारे यांना विचारणा केली होती. मात्र अनुदान मिळाले नाही.
वृद्ध निराधारांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. पुरेसे अन्न मिळत नसल्याने उपासमार होत आहे. वृद्धापकाळात दुसऱ्या पुढे हात पसरण्याचा अपमानास्पद प्रसंग या वृद्धांवर आला आहे. अशा परिस्थितीत ३४ जणांनी जगाचाच निरोप घेतला.
त्यात अंबाजी बनसोडे, आनंदा रोकडे उटी, शेख इमाम शेख फतरु मोरथ, तुळशीराम इंगोले जनुना, अंजूबाई ठाकरे, जनाबाई बोरकर, अनुसया चौधरी, नारायण राऊत करंजखेड, मुक्ताबाई भांडवले कलगाव, तुळसाबाई अढागळे कोठारी, शेख इमाम शेख चाँद काळी टेंभी, शेख हलीमा शेख शेरु, दगडूबाई गोंडाडे, अंजूबाई गुलाब, अनुसया लांडगे, धारुबाई भगत, हुसानाबी नवाबोद्दीन फुलसावंगी, गोपाळ शिंदे इजनी, रायभान चपाट, मुकुंदा भगत वेणी, बैनाबाई गडदने, भाऊ हनवते, शारदाबाई हनवते, गुणाबाई हुलगुंडे सवना, सावित्रीबाई लहाने माळकिन्ही, सरूबाई लोखंडे, धरुबाई गरडे सारखनी, यशोदाबाई पहूर पिंपळगाव, सरस्वती चिपडे, गयाबाई ढोले, नामदेव ढोले, तोतीबाई राठोड गुंज, नागोराव फुलउंबरकर कान्हा, दुर्गाबाई खोकले पिंपळगाव यांचा समावेश आहे.
अनेक निराधार अखेरच्या घटका मोजत आहे. परंतु प्रलंबित प्रकरणांवर प्रशासन तोडगा काढायला तयार नाही. आता प्रशासनाला किती बळी हवे आहेत असा प्रश्न विचारला जात आहे. (शहर प्रतिनिधी)