स्वातंत्र्यपूर्व काळ ते कलासंस्कृतीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 06:00 AM2019-10-13T06:00:00+5:302019-10-13T06:00:19+5:30
९ ऑक्टोबर हा जागतिक टपाल दिन म्हणून जगभरात साजरा होतो. यावर्षी डाक विभागाने ९ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत डाक सप्ताहाचे आयोजन केले आहे. त्यात शनिवारी डाक तिकीट प्रदर्शन पार पडले. यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीपर्यंतचे सर्वच तिकीट प्रसिद्ध केले आहेत.
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : डाक तिकीटांचे आकर्षण आबालवृद्ध सर्वांनाच आहे. या तिकीटांच्या माध्यमातून जगभरातील इतिहास मांडण्याचा प्रयत्न डाक विभागाने केला आहे. ऐतिहासिक घटनांना एकत्रित पाहण्याचा योग शनिवारी यवतमाळकरांना आला. निमित्त होते जागतिक टपाल दिनाचे.
९ ऑक्टोबर हा जागतिक टपाल दिन म्हणून जगभरात साजरा होतो. यावर्षी डाक विभागाने ९ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत डाक सप्ताहाचे आयोजन केले आहे. त्यात शनिवारी डाक तिकीट प्रदर्शन पार पडले. यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीपर्यंतचे सर्वच तिकीट प्रसिद्ध केले आहेत. संग्राहकांनी हे तिकीट प्रदर्शनस्थळी लावले होते. यामुळे जुन्या घटनांना उजाळा मिळाला.
विविध १० संग्राहकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. डाक विभागाचे कर्मचारी सुनिल रोहणकर यांच्या संग्रहाने अनेकांचे लक्ष वेधले. यामध्ये यवतमाळच्या दोन सुपूत्रांच्या छायाचित्रांचा समावेश होता. लोकनायक बापूजी अणे, स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या तिकीटाचा समावेश होता. यासोबतच पारंपरिक रत्न, आभूषणे, चिन्हाच्या तिकीटही प्रदर्शनात लावल्या होत्या. पोस्टाची सर्वात प्राचीन इमारत असलेले तिकीट, स्वातंत्र्यपूर्व काळातील विविध ठिकाणाचा यामध्ये समावेश होता. नुरूद्दीन लालाणी यांनी वास्तूशिल्प, विमानाचे नानाविध मॉडेल, रेल्वेचे विविध इंजीन, डबे, नृत्य आविष्कार या विषयाच्या तिकीट प्रदर्शनात ठेवल्या होत्या. यश शाह यांनी गड, किल्ले, जुने टपाल ते अद्ययावत टपाल, प्रवीण चव्हाण यांनी कोनार्कचे सूर्यमंदिर, विविध देशातील टपाल तिकीट ठेवल्या होत्या. ललित बुबना यांनी भारतीय संत, समाज सुधारक मदर तेरेसा, झलकारीबाई, विजयालक्ष्मी पंडित, अहिल्याबाई होळकर, अण्णा भाऊ साठे, गोपाळकृष्ण गोखले यांच्यासह अनेक तिकीटचा संग्रह या ठिकाणी आणला होता.
डॉ. योगेंद्र मारू यांनी चार्ली चॅप्लीन ते मधुबालापर्यंतच्या कलावंतांवर प्रसिद्ध झालेल्या तिकीट प्रदर्शनात लावल्या होत्या. मजरूह सुलतानपुरी यांच्यासह अनेक कलावंतांचे तिकीट या ठिकाणी होते. प्रा. अविनाश शिर्के यांनी भारतीय वनसंपदा, भारतीय तंत्रज्ञान, पर्यावरण जागृती, स्वातंंत्र्य आंदोलन याविषयावरचे तिकीट प्रदर्शनात ठेवले होते. यासोबत मकरंद जोगवार, भारती जानी, शुभम गंधेवार यांच्या तिकटांचे कलेक्शन या ठिकाणी होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन डाकघर अधीक्षक एम. ए. पत्की, आकाशवाणी उद्घोषक प्रमोद बाविसकर यांनी केले. यावेळी तिकीट संग्राहक डॉ. योगेश मारू होते. या प्रदर्शनात शाळकरी विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या. अनेक तिकीटांचे कलेक्शन केले.
राजमुद्रा, पोस्टकार्डही
या तिकीट प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या पत्राची राजमुद्रा, महात्मा गांधीजींचे पोस्टकार्ड यासह विविध दुर्मिळ लिखाण असलेला संग्रह या ठिकाणी होता.
आजोबांपासून नातवापर्यंत
तिकीटांचा संग्रह आजोबांनी केला. नातवंड आणि मुलांनी त्यात भर घातली, असे तिकीटही या प्रदर्शनात होते. राजेश लढ्ढा, यश शाह, राजू मुरारका यांनी या स्वरूपाचे तिकीट प्रदर्शनात ठेवले होते.