गर्भवती महिलेची प्रसाधनगृहात प्रसूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 05:00 AM2020-05-04T05:00:00+5:302020-05-04T05:00:30+5:30
ग्रामीण भागातील गर्भवती महिलांना सोनोग्राफी व इतर तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात यावे लागते. येथील सोनोग्राफी विभागात तपासणीसाठी महिलांना बराचवेळ वाट पहावी लागते. येथील सोनोग्राफी विभागाची यंत्रणा तुटपुंजी आहे. त्या तुलनेत तपासणीसाठी येणाऱ्या गर्भवती महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेच महिलांना अनेक वेळेस ताटकळत बसून रहावे लागते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण तपासणी विभागात सोनोग्राफीसाठी आलेल्या साडेपाच महिन्याच्या गर्भवती महिलेची प्रसाधनगृहातच प्रसूती झाली. हा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी ११ वाजता दरम्यान घडली.
ग्रामीण भागातील गर्भवती महिलांना सोनोग्राफी व इतर तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात यावे लागते. येथील सोनोग्राफी विभागात तपासणीसाठी महिलांना बराचवेळ वाट पहावी लागते. येथील सोनोग्राफी विभागाची यंत्रणा तुटपुंजी आहे. त्या तुलनेत तपासणीसाठी येणाऱ्या गर्भवती महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेच महिलांना अनेक वेळेस ताटकळत बसून रहावे लागते. येण्या-जाण्याचा आर्थिक भुर्दंड सोसत नसल्याने नाईलाजास्तव महिला येथे बसून असतात.
शुक्रवारी सोनोग्राफीसाठी आलेली महिला बराच वेळ बसल्यानंतर बाह्यरुग्ण तपासणी विभागातील प्रसाधनगृहात लघुशंकेसाठी गेली. महिला लघुशंकेला बसली असता काही कळायच्या आतच तिची त्या ठिकाणी प्रसूती झाली. साडेपाच महिन्याच्या गर्भाला तिने जन्म दिला. तो मुलाचा गर्भ असल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार माहीत होताच या महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला या धक्कादायक घटनेची माहिती दिली. त्या महिलेला लगेच स्त्रीरोग विभागात दाखल करण्यात आले. शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्या अर्भकाचा पंचनामा केला. या प्रकरणी कुठलीही नोंद घेण्यात आली नाही. सदर महिलेची प्रकृती उत्तम असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
ग्रामीण महिलांची नेहमीच हेळसांड
ग्रामीण भागातील गर्भवती महिलांच्या तपासणीसाठी तालुका स्तरावरील रुग्णालयात कोणतीच व्यवस्था नाही. त्यामुळे बहुतांश महिलांना तपासणीकरिता जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात यावे लागते. त्यामुळे यंत्रणेवर क्षमतेपेक्षा अधिक ताण आल्याने हेळसांड होते.