कोरोना अहवाल निगेटिव्ह असूनही गरोदर पोलीस पत्नीला डॉक्टरांनी काढले बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 09:04 PM2020-08-10T21:04:13+5:302020-08-10T21:04:35+5:30
यवतमाळ शहरातील एका ज्येष्ठ जनरल फिजिशियनच्या वाईट वर्तणुकीचा प्रत्यय एका पोलिसाला आला. त्या पोलिसाच्या गर्भवती पत्नीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह येऊनही त्या डॉक्टरने उपचार करण्यास नकार दर्शविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील एका ज्येष्ठ जनरल फिजिशियनच्या वाईट वर्तणुकीचा प्रत्यय एका पोलिसाला आला. त्या पोलिसाच्या गर्भवती पत्नीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह येऊनही त्या डॉक्टरने उपचार करण्यास नकार दर्शविला. एवढेच नव्हे तर त्या डॉक्टरने चक्क कोरोना चाचणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करून त्या दाम्पत्याला बाहेर काढले.
जिल्हा पोलीस दलात कार्यरत एका शिपायाने त्याच्या पत्नीला ताप येत असल्याने डॉ.एस.के. पुराणिक यांच्या शिवाजी गार्डन चौक स्थित रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तपाचे रुग्ण घेत नाही, आधी कोरोना तपासणी करून घ्या, नंतरच तपासले जाईल, असे सांगितले. त्यावरून त्या शिपायाने कोविड केअर सेंटरमध्ये पत्नीची कोरोना तपासणी करवून घेतली. चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर पुन्हा पुन्हा पत्नीला डॉ. पुराणिक यांच्याकडे तपासणीसाठी नेले. मात्र डॉक्टरांनी चक्क कोरोना चाचणीवर विश्वास नसल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी तापाचे रुग्ण तपासू, नये असा आदेश असल्याचे सांगितले. त्याउपर डॉक्टरांनी कोणत्या रुग्णावर उपचार करायचे, कोणावर करायचे नाही, हा माझा अधिकार असल्याचे सांगत त्या दाम्पत्याला बाहेर काढले. गर्भवीत पत्नीला ताप आल्याने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यास मात्र डॉक्टर विसरले नाही.
थेट शासनाकडून होत असलेल्या कोरोना तपासणीवर डॉक्टरांनी संशय व्यक्त करून उपचार नाकारला. अशा प्रकारे काही खासगी डॉक्टर रुग्णांना हाकलून लावत असल्याची तक्रार त्या शिपायाने जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्याकडे केली. तक्रारीची प्रत जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांना दिली. आता प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.