गर्भवती प्रेयसीचा गळा आवळून खून
By admin | Published: December 24, 2015 03:01 AM2015-12-24T03:01:01+5:302015-12-24T03:01:01+5:30
कोळंबी जंगलात पाच दिवसापूर्वी मृतावस्थेत आढळलेल्या महिलेची ओळख पटली असून गर्भवती असलेल्या प्रेयसीचा प्रियकराने गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले.
कोळंबी जंगल : क्रूरकर्मा प्रियकर गजाआड
अकोलाबाजार : कोळंबी जंगलात पाच दिवसापूर्वी मृतावस्थेत आढळलेल्या महिलेची ओळख पटली असून गर्भवती असलेल्या प्रेयसीचा प्रियकराने गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. विवाहित असलेल्या या क्रूरकर्म्या प्रियकराला वडगाव जंगल पोलिसांनी अटक केली आहे.
शशीकला रामकृष्ण लोणसावळे (३०) असे मृत महिलेचे नाव असून ती पारवा पोलीस ठाण्यांतर्गत माथनी येथील रहिवासी आहे. तर वसंता सुखदेव खडके (३२) असे आरोपीचे नाव असून तोही माथनीचा रहिवासी आहे. वसंता हा विवाहित असून त्याला पत्नी व मुलगा आहे. शशीकला हिलासुद्धा एक मुलगा आहे. या दोघात गत वर्षभरापासून अनैतिक संबंध होते. त्यातच शशीकला गर्भवती झाली. वसंता विवाहित असल्याने प्रकरण अंगलट येण्याची शक्यता होती. त्यामुळे शशीकलाचा गर्भपात करण्यासाठी १५ डिसेंबर रोजी यवतमाळला आला. परंतु पैशाअभावी गर्भपात होऊ शकला नाही. एका काळ्यापिवळी जीपने गावी जाण्यासाठी निघाले. रस्त्यात कोळंबी जंगलात ब्रम्हपुरी मंदिराजवळ सायंकाळी ६ वाजता ते थांबले. रात्रभर याच ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतला. परंतु आरोपी वसंताच्या मनात काही वेगळेच होते. मंदिराच्या जवळ झोपलेल्या शशीकलाचा स्कार्पने गळा आवळला. त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर मंदिराजवळून हा मृतदेह उचलून त्याने जंगलात नेऊन टाकला. पहाटे कारेगाव येथून आपल्या गावी पोहोचला. याबाबत कुणालाच खबर नसल्याने वसंता निश्चिंत होता.
दरम्यान वडगाव जंगलचे ठाणेदार पी.पी. राऊत या प्रकरणाचा तपास करीत होते. महिलेचा फोटो गावागावात दाखविण्यात आले. त्यावेळी माथनी येथील महिला असल्याचे पुढे आले. पोलिसांनी अधिक चौकशी करीत आरोपी वसंतालाही ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसी हिसका दाखविताच त्याने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांपुढे कथन केला. अधिक तपास जमादार डी.व्ही. ससाने करीत आहे. आरोपीला २६ डिसेंबरपर्यंत कोठडी दिली. (वार्ताहर)