कामाइतकेच ‘प्रेझेंटेशन’ही महत्त्वाचे
By admin | Published: April 9, 2017 12:47 AM2017-04-09T00:47:12+5:302017-04-09T00:47:12+5:30
तुमचे काम कितीही अप्रतिम असेल, दर्जेदार असेल, तरी उपयोग नाही. आजच्या काळात आपल्या कामाचे योग्य ‘प्रेझेंटेशन’ करता येणे महत्त्वाचे आहे.
अनुराधा पौडवाल : समता पर्वातील कार्यक्रमानिमित्त बातचित, कलाप्रांतातील सांगितला यशाचा मंत्र
यवतमाळ : तुमचे काम कितीही अप्रतिम असेल, दर्जेदार असेल, तरी उपयोग नाही. आजच्या काळात आपल्या कामाचे योग्य ‘प्रेझेंटेशन’ करता येणे महत्त्वाचे आहे. मी सुंदर गाते, मात्र टी-सिरिजने माझे गाणे घराघरात पोहोचविले नसते, तर माझ्या कलेची कदर झाली नसती, अशा शब्दात विख्यात पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांनी कलाप्रांतातील यशाचा मंत्र सांगितला.
समता पर्वाच्या निमित्ताने आयोजित ‘म्युझिकल शो’करिता शनिवारी त्या यवतमाळात आल्या होत्या. त्यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या गायकीचा प्रवास उलगडला. यवतमाळला आज पहिल्यांदाच आले, पण माहूरला जाताना येथून नेहमीच जात असते. खरे म्हणजे, शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून यवतमाळची ओळख आहे. त्यामुळे येथील परिस्थिती नेमकी कशी आहे, हे जाणून घेण्यासाठी मी येथे आले आहे, असे पौडवाल म्हणाल्या. माझ्या सूर्योदय फाऊंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी खूप काम सुरू आहे. बिड जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांना गेल्या वर्षी आम्ही बियाणे वाटप केले. आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलांना शिष्यवृत्तीही दिली. जलसंधारणाचीही कामे सुरू आहेत. पण शेतकऱ्यांचे दु:ख हे आभाळाएवढे आहे. कोणी एकटा माणूस ते शिवू शकत नाही. आपल्याकडून जेवढे होईल, तेवढे आपण करत राहायचे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
जसा समाज असेल तसे संगीत निर्माण केले जाते. आता इंटरनेटमुळे जग छोटे झाले आहे. त्यामुळे संगीत प्रकारांचे एकप्रकारे ‘फ्यूजन’ होत आहे. पूर्वी ६०० वाद्यवृंदांसोबत गायक ‘लाईव्ह’ रेकॉर्डिंग करायचे. आता ट्रॅकवर रेकॉर्डिंग केले जाते. ‘टेक्नॉलॉजी’च्या गर्दीत गाण्याचा गोडवा हरवला. आदिशंकराचार्यांचे लिखान रेकॉर्ड करण्याचा मनोदय शेवटी अनुराधा पौडवाल यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला समता पर्व आयोजन समितीचे मुख्य समन्वयक अंकुश वाकडे, प्रवक्ता राजूदास जाधव, जयश्री भगत, अध्यक्ष किशोर भगत, उपाध्यक्ष सिद्धार्थ भवरे, अॅड. रामदास राऊत, मधुकर भैसारे, प्रवीण देवतळे आदी उपस्थित होते.
(स्थानिक प्रतिनिधी)
मला डॉक्टर बनायचे होते !
आमच्या घरात गाण्याला प्रचंड विरोध होता. माझ्या वडिलांचा तर खूपच विरोध होता. लहान असताना मी घरात साधे गुणगुणले तरी ते रागवायचे. चांगल्या घरातील मुलींनी गाऊ नये, असे सांगायचे. मला मात्र गाण्याची प्रचंड आवड. शास्त्रीय संगीताचे धडे मी गिरवू शकले नाही. पण माझे साधे सहज गाणे संगीतकारांना आवडले अन् मी गायिका झाले. मुळात मला डॉक्टर बनायचे होते. वडिलांचीही तीच इच्छा होती. पण झाले तेही चांगलेच झाले, असे अनुराधा पौडवाल म्हणाल्या. जुन्या काळात मोजकेच करिअरचे मार्ग होते. पण आज मार्ग वाढले आहेत. त्यामुळे मुलींनी मागे न हटता आपल्या आवडीचे करिअर जरूर करावे, असा वडिलकीचा सल्लाही त्यांनी दिला.
पुरस्कार हा प्रसाद, मिळेल तेव्हा खायचा !
अनुराधा पौडवाल यांना यंदा पद्मश्री पुरस्कार मिळाला. पद्मश्री मिळण्यास उशीर नाही झाला का, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, पुरस्कार हा देवाचा प्रसाद आहे. मिळेल तेव्हा खायचा. कलेला सामाजिक कार्याची जोड आवश्यक आहे. आशिकी, दिल है के मानता नही, बेटा सिनेमातील गाणी हिट झाली तेव्हाच पुरस्कार मिळायला हरकत नव्हती. गेल्या दोन वर्षांपासून मी शेतकऱ्यांसाठी कार्य सुरू केले आणि झटक्यात पद्मश्रीही मिळाला, असा काहीसा खुलासाही त्यांनी केला.
माझे गाणे महिला सक्षमीकरणासाठी
समता पर्व ही प्रबोधनाची परंपरा आहे. इथे विचार देण्याचे काम होते. मीही माझ्या गाण्यातून विचार देण्याचा प्रयत्न करणार आहे. महिला सक्षमीकरणाला पाठबळ मिळावे, म्हणूनच मी बचतगटाच्या आग्रहावरून येथे आले. संगीतातील विविध प्रकारांप्रमाणे बुद्ध-भीमगीतेही महत्त्वाची आहेत. मीही ती गात असते. जनजागृती निर्माण करणे हेच कलाकाराचे काम असते, असे अनुराधा पौडवाल यांनी सांगितले.