कामगार कार्यालयात चक्क बोगस प्रमाणपत्रे सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 09:28 PM2019-06-27T21:28:09+5:302019-06-27T21:28:57+5:30
कामगार कार्यालयातील योजना लाटण्यासाठी चक्क बोगस प्रमाणपत्र, स्वाक्षरी, पावती पुस्तकांचा वापर कामगारांच्या नावाने दलालांकडून होत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. अशी अनेक बोगस कागदपत्रे योजनेच्या लाभासाठी सादर केली गेली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कामगार कार्यालयातील योजना लाटण्यासाठी चक्क बोगस प्रमाणपत्र, स्वाक्षरी, पावती पुस्तकांचा वापर कामगारांच्या नावाने दलालांकडून होत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. अशी अनेक बोगस कागदपत्रे योजनेच्या लाभासाठी सादर केली गेली. या प्रकरणात कामगार कार्यालयाकडून पोलिसात तक्रारी करून संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ७३ हजार मजुरांची नोंदणी झाली आहे. यातील ५० हजार मजुरांना कीट वितरित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासोबतच नवीन कामगारांच्या नोंदणी आणि नुतनीकरणाचे कामही सुरू आहे. याकरिता कामगार कार्यालयात प्रचंड गर्दी होत आहे. या गर्दीत काही कामगारांकडे बोगस पुस्तके आढळली आहेत. बोगस पावतीबुक, त्यावर स्वाक्षऱ्या सापडल्या आहेत.
यामुळे कामगार कार्यालय चक्रावून गेले आहे. १ आॅगस्ट २०१८ पूर्वी कामगाराची नोंदणी करणाºया कामगारांना पिवळे पुस्तके वितरित झाले. तर १ आॅगस्ट २०१८ नंतर कामगारांना पांढरे पुस्तके वितरित झाले. कॅम्पमधील कामगारांना पांढरे पुस्तके वितरित करण्यात आले होते. असे असले तरी कामगारांजवळ १ आॅगस्ट २०१८ नंतरच्या तारखेचे पिवळे पुस्तक आढळले. त्याचे नूतनीकरण करण्यासाठी कामगार हे पुस्तक घेऊन येत आहेत. कामगारांना ही पिवळी पुस्तके दिली कुणी, त्यांच्याजवळ डुप्लीकेट स्वाक्षरी असलेल्या पावत्या आल्या कशा, यासारखे अनेक प्रश्न कामगार कार्यालयापुढे निर्माण झाले. कर्मचाऱ्यांनी हा प्रकार जिल्हा कामगार अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिला. या प्रकरणात जिल्हा कामगार अधिकाºयांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
सोमवारी नोंदणी करण्यासाठी येणाºया मजुरींकडून पैसे उकळणारे एजंट शासकीय कार्यालयाच्या परिसरात आहे. अशांना चाप लावण्यासाठी प्रशासनाने पत्र दिले आहे. यानंतरही पोलीस प्रशासनाने एजंटांवर कारवाई केली नाही. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरासह तालुक्यातही एजंटांचा सुळसुळाट आहे.
ग्रामसेवकांकडून बोगस प्रमाणपत्र
जिल्ह्यात कामगारांची संख्या कमी आहे. असे असले तरी कामगार कार्यालयात मजुरांची संख्या जास्त आहे. हे मजूर आले कुठून, हा खरा प्रश्न आहे. या प्रकरणाच्या मुळाशी गेल्यानंतर ग्रामसेवक मजूर नसणाऱ्यां व्यक्तींना मजुराचे प्रमाणपत्र देत असल्याचा प्रकार उघड झाला.
थेट कर्मचाºयांना धमक्या
कामगार कार्यालयातील पुस्तक मिळावे आणि किट वितरित व्हाव्या म्हणून कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दूरध्वनी करून धमकावल्या जात आहे. याप्रकरणाची तक्रार कर्मचाऱ्यांनी जिल्हा कामगार अधिकाऱ्यांकडे नोंदविली आहे. यामुळे यात राजकीय हस्तक्षेप वाढण्याचा धोका वाढला आहे.
बोगस कामगारांना रोखण्यासाठी स्पॉट व्हेरीफीकेशन केले जाणार आहे. या प्रकरणात ग्रामसेवकांनी हा मजूर आहे असे प्रमाणपत्र दिले आहे. यातील अनेक प्रमाणपत्र बोगस आहे. यामुळे ग्रामसेवक आणि बोगस मजुरांसह एजंटांवरही फौजदारी कारवाई होणार आहे.
- राजदीप धुर्वे
जिल्हा कामगार अधिकारी, यवतमाळ