अध्यक्ष-सभापती आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 11:51 PM2018-01-23T23:51:24+5:302018-01-23T23:51:36+5:30

जिल्हा परिषदेच्या पदाधिकाºयांमधील वर्चस्वाचा वाद संपण्याची चिन्हे नाहीत. आर्णीतील एक काम आपल्याच मर्जीतील व्यक्तीला मिळावे, यासाठी अध्यक्ष व बांधकाम सभापती पुन्हा एकदा आमने-सामने उभे ठाकल्याचे सांगितले जाते.

President-chairperson face-to-face | अध्यक्ष-सभापती आमने-सामने

अध्यक्ष-सभापती आमने-सामने

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद : आर्णीतील बांधकाम कंत्राटाचा वाद, ‘ईर्इं’ची वरिष्ठांकडे धाव

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांमधील वर्चस्वाचा वाद संपण्याची चिन्हे नाहीत. आर्णीतील एक काम आपल्याच मर्जीतील व्यक्तीला मिळावे, यासाठी अध्यक्ष व बांधकाम सभापती पुन्हा एकदा आमने-सामने उभे ठाकल्याचे सांगितले जाते. या भांडणातून मध्यम मार्ग काढण्यासाठी बांधकाम कार्यकारी अभियंत्याने आता थेट सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठांकडे धाव घेतली आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माधुरी आडे आणि बांधकाम सभापती निमीष मानकर यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वर्चस्वाचा वाद सुरू आहे. बैठकीतून बहिष्कार टाकण्यापर्यंत हा वाद गेला होता. गेली काही दिवस शांत असताना आता पुन्हा एका बांधकामावरून हे दोनही पदाधिकारी टोकाच्या भूमिकेवर आले आहे. सूत्रानुसार, १६ डिसेंबरला जिल्हा परिषदेत बांधकामाच्या निविदा काढल्या गेल्या. त्यात आर्णी-महाळुंगी या मार्गावरील भंडारी येथील एक किलोमीटरच्या रस्ते सुधारणेच्या १५ लाखांच्या कामावरुन अध्यक्ष-सभापती आमने-सामने उभे ठाकले आहे. या कामासाठी पाच निविदा आल्या होत्या. परंतु दोन निविदा कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने उघडल्याच गेल्या नाही. अन्य तीनपैकी २.८३ टक्के कमी दराची सागर नामक सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याची निविदा मंजूर झाली. रेकॉर्डवर सागर यांचे नाव असले तरी प्रत्यक्षात जिल्हा परिषद अध्यक्षांच्या मर्जीतील छोटू नामक व्यक्ती हे काम करणार असल्याचे सांगितले जाते. तर दुसरीकडे ज्या दोन निविदा उघडल्या गेल्या नाही, त्यात यवतमाळातील राजकीय नेता तथा कंत्राटदाराच्या भाच्याची निविदा आहे. या भाच्याला कोणत्याही परिस्थितीत काम मिळवून देण्याचा त्या नेत्याचा प्रयत्न आहे. परंतु हा भाचा अगदीच नवखा आहे, त्याची या कामाच्या निमित्ताने पहिलीच एन्ट्री आहे. नव्या कंत्राटदाराला किमान पाच लाखांच्या कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. हा अनुभव नसल्याने ही निविदा उघडली गेली नसल्याचे सांगितले जाते. या दोनपैकी एक निविदा १८ टक्के तर दुसरी १० टक्के कमी दराची असल्याची माहिती आहे.
कार्यकारी अभियंता संजय राठोड यांचा कल सामाजिक भावनेतून अध्यक्षांकडे अधिक असल्याचा सूर ऐकायला मिळतो आहे. अध्यक्ष-सभापतीच्या या भांडणात कोंडीत सापडलेल्या कार्यकारी अभियंत्याने या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधीक्षक अभियंत्याचे मार्गदर्शन मिळविण्यासाठी धडपड चालविली आहे. सुमारे दोन आठवड्यांपासून जिल्हा परिषदेत अध्यक्ष-सभापतीचा हा वाद धुमसतो आहे. त्यात काय तोडगा निघतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. न उघडलेले टेंडर ओपन होते की, सागरला वर्कआॅर्डर मिळून छोटू कामाला लागतो, याकडे जिल्हा परिषदेच्या नजरा लागल्या आहे. या निर्णयावर अध्यक्ष-सभापतींची राजकीय ताकद अधोरेखीत होणार आहे, हे विशेष.
सभापतींनी वर्कआॅर्डर रोखली
ही निविदा उघडावी यासाठी बांधकाम सभापतींचा प्रयत्न आहे. निविदांची ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक झाल्याचे समाधान होईस्तोवर सागरला प्रत्यक्ष कामाचे आदेश जारी करू नये, असे पत्र सभापतींनी दिले आहे. तर छोटूला काम न भेटल्यास कुणालाही सोडणार नाही, अशा शब्दात अध्यक्षांनी खासगीत टोकाची भूमिका मांडल्याची चर्चा बांधकाम विभागात आहे.

आर्णीतील प्रकरणात आपण मार्गदर्शन मागितले आहे. आजही अधीक्षक अभियंत्याच्या भेटीसाठी गेलो होतो. मात्र भेट होऊ शकली नाही. नियमानुसारच त्या दोन निविदा उघडल्या गेल्या नाही. पुरेशी कागदपत्रे नसणे हे त्यामागे कारण आहे.
- संजय राठोड,
कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्र. २

Web Title: President-chairperson face-to-face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.