तीन हजार विद्यार्थिनींचे श्वास रोखून विद्यार्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 09:57 PM2018-08-25T21:57:51+5:302018-08-25T21:58:58+5:30
शहराच्या हृदयस्थानी जाणाऱ्या मार्गावर असलेल्या शाळांमधील विद्यार्थिनींना श्वास रोखून विद्यार्जन करावे लागत आहे. शिवाय विद्युत कंपनीचे कर्मचारी, लहान व्यावसायिक आणि ये-जा करणाऱ्या नागरिकांचाही श्वास गुदमरत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहराच्या हृदयस्थानी जाणाऱ्या मार्गावर असलेल्या शाळांमधील विद्यार्थिनींना श्वास रोखून विद्यार्जन करावे लागत आहे. शिवाय विद्युत कंपनीचे कर्मचारी, लहान व्यावसायिक आणि ये-जा करणाऱ्या नागरिकांचाही श्वास गुदमरत आहे. नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभाराने हे हाल सहन करावे लागत आहे. पालिकेचा गोठा म्हणून ओळख असलेल्या रिकाम्या जागेत टाकला जाणारा कचरा जिवावर उठला आहे.
येथील बसस्थानकाला लागूनच नगरपरिषदेची भली मोठी जागा आहे. काही वर्षांपूर्वी याठिकाणी नगरपरिषदेची नादुरुस्त वाहने यासह विविध साहित्य ठेवले जात होते. आता मात्र या जागेला कचरा डेपोचे स्वरुप आले आहे. शहराच्या विविध भागातून गोळा होणारा सर्वप्रकारचा कचरा याठिकाणी आणून टाकला जातो. ओल्या कचऱ्याची आणि आता पावसामुळे ओला झालेल्या कचऱ्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या.
कचरा डेपोला लागूनच अभ्यंकर कन्या शाळा, रमाबाई आंबेडकर कन्या शाळा आहे. याठिकाणी जवळपास तीन हजार विद्यार्थिनी शिक्षण घेतात. काही लोकांनी अतिक्रमण करून विविध प्रकारचे व्यवसाय थाटले आहे. किरायाने देण्यासाठीची वाहनेही याठिकाणी उभी राहतात. कचऱ्याची दुर्गंधी सर्वत्र पसरते. रमाबाई आंबेडकर कन्या शाळेच्या अगदी भिंतीला लागूनच कचरा डेपो आहे. या शाळेत तसेच अभ्यंकर कन्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना श्वास रोखून विद्यार्जन करावे लागत आहे. विद्युत कंपनीच्या इमारतीतील कर्मचाऱ्यांचेही सतत नाकावर हात असतात. या परिसरातील नागरिकांनी ही कचरा कोंडी दूर करण्याची मागणी नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांकडे मांडली. मात्र कुणीही गांभीर्याने घेतले नाही. शनिवारी याठिकाणचा कचरा जेसीबीने उचलला जात असताना याभागातून प्रत्येक जण नाक दाबून मार्ग काढत होता. पालिकेने ही समस्या निकाली काढावी, अशी मागणी या परिसरातील व्यावसायिक शेख जाकीर, अशोक सिंघानिया, दिलीप मानेकर, प्रमोद राय, जहूर भाई, रऊफ भाई, बलवंत राऊत, नंदू राऊत, रिजवान भाई आदींनी केली आहे.