प्राथमिक आरोग्य केंद्रे वाऱ्यावर
By admin | Published: July 5, 2014 11:49 PM2014-07-05T23:49:24+5:302014-07-05T23:49:24+5:30
राज्यभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यरत डॉक्टरांनी संप पुकारल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रे वाऱ्यावर आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांचे हाल होत असून रुग्ण दगावण्याचे प्रकार घडत आहेत.
रूग्णांचे हाल : डॉक्टरांच्या संपाचा ग्रामीण जनतेला बसतोय फटका
वणी : राज्यभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यरत डॉक्टरांनी संप पुकारल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रे वाऱ्यावर आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांचे हाल होत असून रुग्ण दगावण्याचे प्रकार घडत आहेत.
जिल्हा परिषदेच्या अधिनस्त येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यरत डॉक्टरांनी त्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यव्यापी संप पुकारला आहे. राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या आवाहनानुसार या संपात प्राथमिक आरोग्य केंद्रांचे डॉक्टर सहभागी झाले आहेत. परिणामी ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र वाऱ्यावर आहेत. ऐन पावसाळ्याच्या दिवसांत डॉक्टरांनी संप पुकारल्याने साथ रोगांची लागण झाल्यास भयावह अवस्था निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.
ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य याच प्राथमिक आरोग्य केंदांवर अवलंबून असते. ग्रामीण भागात आधीच आरोग्याच्या तोकड्या सुविधा असतात. लहान गावांमध्ये तर खासगी डॉक्टरांचेही दवाखाने नसतात. केवळ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रावरच त्यांची आरोग्याची मदार असते. परिसरातील अनेक गावे या केंद्र आणि उपकेंद्रांना जोडलेली असतात. याच केंद्र व उपकेंद्रातून ग्रामीण जनतेच्या आरोग्याची काळजी वाहिली जाते.
आता याच प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णांचे बेहाल होत आहे. ऐन खीरपाच्या हंगामात ग्रामीण जनतेवर ही वेळ ओढवली आहे. खरीपात शेतकरी आणि मजुरांची सर्वत्र लगबग असते. या चारच महिन्यात त्यांना वर्षभराची तजवीज करावी लागते. मजुरांना आता निंदण, खुरपणीची कामे मिळतात. मात्र यावर्षी अद्याप दमदार पाऊस आल्याने तूर्तास निंदण, खुरपण, डवरणीची कामे रखडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह मजुरांचेही हाल होत आहे. त्यात ग्रामीण भागात आता कुणी आजारी पडल्यास त्यांना आरोग्य सेवा मिळणेही कठीण झाले आहे.
गावांमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन रुग्ण परत येत आहे. त्यांना उपचार मिळणे कठीण झाले आहे. बऱ्याच रुग्णांना शहरात येऊन खासगी डॉक्टरांकडून उपचार करवून घेणे अशक्य झाले आहे. त्यासाठी पैसा खर्च करण्याइतपतही अनेकांची पत नाही. आरोग्य केंद्रातून तातडीने सुविधा मिळत असल्याने ग्रामीण भागातील जनतेचा त्याकडे ओढा असतो.
मात्र आता खुद्द डॉक्टरच संपावर गेल्याने ही प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे वाऱ्यावर सापडली आहेत. केवळ सहायक कर्मचारी आणि परिचारीकांच्या भरवशावर ती सुरू आहेत. परिणामी ग्रामीण रुग्णांचे आरोग्यच धोक्यात सापडले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)