आॅनलाईन कामांविरुद्ध प्राथमिक शिक्षकांचा उठाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 10:05 PM2017-10-09T22:05:06+5:302017-10-09T22:05:16+5:30
‘आम्हाला फक्त शिकवू द्या’ असा आक्रोश करीत बळजबरीने लादल्या जाणाºया आॅनलाईन कामांविरुद्ध जिल्हा परिषद शिक्षकांनी बहिष्काराचे हत्यार उपसले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ‘आम्हाला फक्त शिकवू द्या’ असा आक्रोश करीत बळजबरीने लादल्या जाणाºया आॅनलाईन कामांविरुद्ध जिल्हा परिषद शिक्षकांनी बहिष्काराचे हत्यार उपसले आहे. सर्व पंचायत समित्यांपुढे सत्याग्रह आंदोलन केल्यानंतर सोमवारी जिल्हाभरातील शिक्षकांनी जिल्हास्तरावर एकत्रित उठाव केला. तब्बल अडीच हजारांहून अधिक शिक्षक या आंदोलनात सहभागी झाल्याने शिक्षण विभागाच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
२३ शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन समन्वय कृती समितीच्या छत्रछायेत बहिष्कार आंदोलन सुरू केले. २ आॅक्टोबर रोजी सोळाही पंचायत समित्यांपुढे सत्याग्रह करण्यात आला. त्यानंतर सोमवारी जिल्हा समन्वयक रवींद्र कोल्हे यांच्या पुढाकारात हजारो शिक्षक एकत्र जमले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील तिरंगा चौकात झालेल्या सत्याग्रह आंदोलनाला माजी आमदार विजयाताई धोटे, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती देवानंद पवार, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष वासूदेव महल्ले आदींनी भेटी देऊन पाठिंबा दर्शविला. जिल्हा समन्वयक रवींद्र कोल्हे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांना मागण्यांचे निवेदन सोपविले.
यावेळी विदर्भ प्रदेशाध्यक्ष सुनील केने, राज्य समन्वयक मधुकर काठोळे, राजूदास जाधव, दिवाकर राऊत, ज्ञानेश्वर नाकाडे, रमाकांत मोहरकर, सुभाष धवसे, सतपाल सोवळे, किरण मानकर, जयवंत डुबे, शहाजी घुले, शरद घारोड, विनोद डाखोरे, अशोक चौधरी, महेंद्र वेरुळकर, मनीष राठोड, हयात खान, गजानन मडावी, सैयद शेरू, साहेबराव पवार, नदीम पटेल, ताजोद्दीन काजी, संजय मस्के, पुरुषोत्तम ठोकळ, जगदीश ठाकरे, गजानन पोयाम आदींनी सहकार्य केले.