मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया होणार १२ जूनला; खातेप्रमुखांच्या बैठकीत सीईओंचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2023 07:38 PM2023-05-30T19:38:23+5:302023-05-30T19:39:01+5:30
Yawatmal News गेल्या कित्येक दिवसांपासून रखडलेली मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया आणि विषय शिक्षक पदोन्नती प्रक्रिया मार्गी लागणार आहे. येत्या १२ जून रोजी मुख्याध्यापक पदासाठी शिक्षकांचे समुपदेशन घेतले जाणार आहे.
यवतमाळ : गेल्या कित्येक दिवसांपासून रखडलेली मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया आणि विषय शिक्षक पदोन्नती प्रक्रिया मार्गी लागणार आहे. येत्या १२ जून रोजी मुख्याध्यापक पदासाठी शिक्षकांचे समुपदेशन घेतले जाणार आहे. मंगळवारी सीईओंनी आपल्या कक्षात घेतलेल्या खातेप्रमुखांच्या व शिक्षक संघटनांच्या बैठकीत हे आश्वासन दिले.
जिल्हा परिषद शिक्षकांचे विविध प्रश्न प्रलंबित असल्यामुळे खातेप्रमुखांसह बैठक घेण्याची मागणी पुढे आली होती. याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने १५ मे रोजी सीईओ डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना निवेदन दिले होते. त्याची तातडीने दखल घेत सीईओंनी बैठकीसाठी ३० मे ही तारीख निश्चित करून सर्व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना समस्या मांडण्यासाठी निमंत्रित केले होते. त्यानुसार मंगळवारी झालेल्या बैठकीला जवळपास ४५ शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. प्रामुख्याने पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख यांची रखडलेली पदोन्नती प्रक्रिया बैठकीच्या अजेंड्यावर आली. सर्व संघटनांनी लेखी स्वरूपातही समस्या मांडल्या. याचे गांभीर्य लक्षात घेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांची पदोन्नती प्रक्रिया राबविण्यासाठी १२ जून रोजी समुपदेशनाची घोषणा केली.
याशिवाय आदिवासी नक्षलग्रस्त भागात कार्यरत असलेल्या शिक्षकांना चटई क्षेत्राप्रमाणे घरभाडे भत्ता देण्याची मागणीही बैठकीच्या अग्रक्रमावर होती. त्याबाबत सीईओंनी सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, प्राथमिक शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांच्यासह लेखा व वित्त अधिकारी, विस्तार अधिकारी पप्पू पाटील भोयर तसेच जिल्हा परिषदेतील सर्व खातेप्रमुख, समग्र शिक्षा कक्षाचे धनंजय गव्हाणे उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य नेते मधुकर काठोळे, जिल्हाध्यक्ष राजेश उदार, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाचे आसाराम चव्हाण, शशिकांत खडसे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे तुषार आत्राम, शिक्षक समितीचे संदीप मोवाडे, जुनी पेन्शन संघटनेचे नदीम पटेल, शरद घारोड, इनायत खान, शशिकांत चापेकर, प्रोटॉन संघटनेचे गजानन उल्हे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
विषय शिक्षकांचेही समुपदेशन
मुख्याध्यापक पदोन्नतीप्रमाणे विषय शिक्षक पदोन्नती प्रक्रियादेखील राबविली जाणार आहे. त्यासाठी १६ जून रोजी जिल्हा परिषदेत समुपदेशन प्रक्रिया घेतली जाणार आहे. महत्त्वाच्या प्रश्नांवर बैठकीत चर्चा होऊन सीईओंनी थेट तारखाच घोषित केल्यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.