यवतमाळ येथील प्राचार्य शंकरराव सांगळे यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 05:59 AM2018-11-07T05:59:07+5:302018-11-07T05:59:12+5:30
यवतमाळच्या सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील अनेकांचे आधारस्तंभ, अमोलकचंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य शंकरराव ठकाजी सांगळे यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले.
यवतमाळ : यवतमाळच्या सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील अनेकांचे आधारस्तंभ, अमोलकचंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य शंकरराव ठकाजी सांगळे यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या इच्छेप्रमाणे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला देहदान करण्यात आले. स्वातंत्र्य संग्राम सेनानी, लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे ते अत्यंत जवळचे स्नेही होते.
बुलडाणा जिल्ह्यातील दुसरबीड हे प्राचार्य सांगळे यांचे मूळगाव आहे. त्यांचा जन्म ११ सप्टेंबर १९४० ला झाला. यवतमाळच्या अमोलकचंद महाविद्यालयात प्राचार्य म्हणून त्यांचा कार्यकाळ संस्मरणीय ठरला.
त्यांच्या निवासस्थानी लोकमत मीडिया प्रा. लि.चे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांच्या अध्यक्षतेत श्रद्धांजली सभा झाली. विजय दर्डा म्हणाले, प्राचार्य सांगळे सर म्हणजे उत्तम सहकारी, उत्कृष्ठ प्राध्यापक, संचालक असे व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे आणि दर्डा परिवाराचे जुने ऋणानुबंध आहे. बाबूजींवर त्यांचे अगाध प्रेम होते. त्या काळात त्यांनी गावागावात फिरून लोकमतचा प्रचार प्रसार केला.
लोकमतचे एडिटर इन चिफ, माजी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा म्हणाले, सांगळे सरांच्या निधनाने दर्डा परिवारावरही आघात झाला आहे. येत्या २५ नोव्हेंबरला जेव्हा बाबूजींची पुण्यतिथी राहील तेव्हा सांगळे सरांची उणीव सर्वांनाच जाणवणार आहे. कारण १९९७ पासून असे एकही वर्ष नाही, की जेव्हा बाबूजींच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे नियोजन, संचालन सांगळे सरांनी केले नाही.
रविवारी सामूहिक श्रद्धांजली
गोधनी रोडवरील अमोलकचंद महाविद्यालय येथे रविवार ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.