अर्थसंकल्पात कृषी, शिक्षणाला प्राधान्य
By admin | Published: March 23, 2016 02:11 AM2016-03-23T02:11:42+5:302016-03-23T02:11:42+5:30
कृषी आणि शिक्षणाला सर्वाधिक प्राधान्य देणारा जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प मंगळवारी विशेष सभेत सादर करण्यात
यवतमाळ : कृषी आणि शिक्षणाला सर्वाधिक प्राधान्य देणारा जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प मंगळवारी विशेष सभेत सादर करण्यात आला. आर्थिक वर्ष २०१६-१७ साठी विविध योजनांवर ३६ कोटी ७५ लाख २८ हजार रुपयांच्या निधीचे नियोजन या अर्थसंकल्पात करण्यात आले. त्याला सभागृहाने मान्यता दिली.
यवतमाळ जिल्हा परिषदेच्या सभागृहात मंगळवारी अर्थसंकल्प संदर्भात विशेष सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे होत्या. या सभेत अर्थ व बांधकाम सभापती सुभाष ठोकळ यांंनी हा अर्थसंकल्प सादर केला. मंगळवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे आत्महत्याग्रस्त शेतकरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक निधीची तरतूद करण्यात आली. त्यात कृषी, १३ वने आणि समाज कल्याणअंतर्गतच्या शेती साहित्य वाटपांच्या योजनांसाठी पाच कोटी ६२ लाख ५९ हजारांची भरीव तरतूद करण्यात आली. सभापतींचे भाषण आटोपताच सत्ताधारी व विरोधी सदस्यांनी २०१५-१६ या आर्थिक वर्षात प्रत्येक विभागनिहाय खर्चाचे विवरण मागितले. यावेळी समाज कल्याण विभागाकडून केवळ २० टक्के निधी खर्च झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली. विविध विभागांकडून मागील वर्षीच्या एकूण महसुली उत्पन्नापैकी तब्बल १४ कोटी ८८ लाख ८४ हजार रुपये अखर्चित असल्याचे सांगण्यात आले. कृषी, शिक्षण वगळता इतर विभागातील बहुतांश निधी अखर्चित असल्याबाबत सदस्यांनी आक्षेप घेतला. (कार्यालय प्रतिनिधी)
४सर्वशिक्षा अभियानातील शाळांमध्ये शालेय साहित्य खरेदीसाठी ७७ लाख रुपये देण्यात आले. मात्र ही साहित्य खरेदीची प्रक्रिया शाळा व्यवस्थापन समितीकडून न करता नागपूरच्या एका कंपनीकडून थेट पुरविण्यात आले. व्यवस्थापन समितीच्या खात्यात टाकलेली रक्कम परस्परच काढून घेण्यात आली, असा मोठा अपहार झाल्याचा आरोप सदस्यांनी यावेळी केला.
काँग्रेस सदस्यात खडाजंगी
४सभेमध्ये नियोजन समितीतील ३०-५४ च्या मुद्यावरून काँग्रेस सदस्यांमध्येच खडाजंगी झाली. येथेही बोलू देत नाही, तेथेही बोलताना येत नाही, तुम्ही परस्पर मॅनेज करून निधी मिळविता हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा उघड आरोप काँग्रेस सदस्याने आपल्या पक्षाच्या सदस्यावरच केला.
४महसुली उत्पन्न २१ कोटी ८७ लाखांचे
४कृषी विभागाला तीन कोटी ५७ लाख
४१३ वने अंतर्गत एक कोटी दहा लाख
४समाज कल्याणला दोन कोटी ५० लाख
४महिला बालकल्याणला एक कोटी ३१ लाख
४शिक्षण विभागाला ८४ लाख दहा हजार
४आरोग्य विभागाला ३३ लाख
४सिंचनला २० लाख
४पशुसंवर्धनला ९७ लाख
४बांधकाम विभागाला दोन कोटी ८८ लाख
४जिल्हा परिषद सदस्यांना चार लाखांचा वैयक्तिक निधी
४बोकड खरेदीच्या योजनेला स्थगिती
४अखर्चित निधीने आकडे फुगले