केस कापल्यावरून यवतमाळात कैद्याचा कारागृह अधिकाऱ्यावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 02:28 PM2020-12-01T14:28:11+5:302020-12-01T14:28:42+5:30
Yawatmal News prison यवतमाळ येथील जिल्हा कारागृहात खुनाच्या आरोपात अटकेत असलेल्या बंद्याने मंगळवारी दुपारी जेलरवर हल्ला केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जिल्हा कारागृहात खुनाच्या आरोपात अटकेत असलेल्या बंद्याने मंगळवारी दुपारी जेलरवर हल्ला केला. यानंतर कारागृहात अनागोंदी निर्माण झाली. सर्वच कैदी जोरजोराने ओरडून गोंधळ घालू लागले. कारागृहातील सुरक्षेचे सायरन वाजल्याने तात्काळ पोलीस पथक कारागृह परिसरात दाखल झाले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
सहायक कारागृह अधीक्षक शेख हे नेहमीप्रमाणे दुपारी कारागृहातील बराखींची पडताळणी करत होते. त्यावेळी आरोपी राहुल ऊर्फ शिणू शिंदे रा.जामनकर नगर याला शेख यांनी केस असे का कापले म्हणून विचारणा केली. त्यावरून भडकलेल्या राहुलने थेट शेख यांच्यावर हल्ला चढविला. बंद्याकडून मारहाण होत असल्याचे लक्षात येताच इतर कर्मचारी मदतीला धावून आले. मात्र त्यानंतर कारागृहातील इतर कैद्यांनी व बंद्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. जोरजोराने आरडाओरडा सुरू झाला. मदतीसाठी सायरन वाजवण्यात आले.
हा आवाज ऐकून कारागृह कर्मचारी व शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनंजय सायरे पथकासह परिसरात दाखल झाले. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धारणे, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख प्रदीप शिरस्कर यांनी घटनास्थळाला भेट दिली. हल्ला करणाऱ्या कैद्याविरोधात अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. राहुल ऊर्फ शिणू शिंदे याने १४ डिसेंबर २०१९ रोजी विनेश राठोड या युवकाचा वाघापूर टेकडी परिसरात खून केला होता. त्या आरोपातच तो कारागृहात आहे. कारागृहातील अशा कुख्यात आरोपींना येरवाडा व नागपूर कारागृहात पाठविण्यात येणार असल्याचेही सांगितले जात आहे. या घटनेनंतर कारागृह प्रशासनाने अशा बंद्यांची यादीच तयार केली आहे.