खासगी कंपन्या उचलणार शासकीय योजनांचा भार
By Admin | Published: February 25, 2015 02:19 AM2015-02-25T02:19:14+5:302015-02-25T02:19:14+5:30
जिल्हा परिषदेकडून गावपताळीवर अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र अनेक लाभार्थी केवळ निकषात बसत नाही म्हणून योजनेपासून वंचित राहतात.
यवतमाळ : जिल्हा परिषदेकडून गावपताळीवर अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र अनेक लाभार्थी केवळ निकषात बसत नाही म्हणून योजनेपासून वंचित राहतात. अशा व्यक्तीसाठी खासगी कंपन्याची मदत घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पुढाकार घेऊन संयुक्त बैठक आयोजित केली आहे.
जिल्ह्यात एसीसी सिमेंट, वेस्टर्न कोल लिमिटेड, एनसीसी, एल अॅन्ड टी, रिलायन्स फाऊडेन्शन, अॅप्रो या कंपन्याकडून स्वयंसेवी तत्वावर काम करतात. आता या कंपन्याच्या आर्थिक मदतीतून रखडलेल्या योजना पूर्ण करण्यात येणार आहे. विशेष करून जलयुक्त शिवार अभियान, शौचालय निर्मिती, स्वच्छता अभियानासाठी सहकार्य घेतले जाणार आहे. याच अनुषंगाने मंगळवारी दुपारी जिल्हा परिषदेत खासगी कंपन्यासोबत संयुक्त बैठक झाली. २ मार्चला पुन्हा सर्व शासकीय यंत्रणाची संयुक्त बैठक घेण्यात येत आहे.
खासगी कंपन्याच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम राबविला जाणार आहे. अनेकदा वैयक्तीक योजनेतील लाभार्थ्यांना शासन निकषामुळे काम पूर्ण करत येत नाही. घरकूलाचा हप्ता मिळविण्यासाठी काहींनी शौचलयाची अट पूर्ण केलेली नसते. अशा जुन्या लाभार्थ्यांना खासगी कंपन्यांकडून अर्थसहाय घेऊन त्याचे रखडलेले काम कसे पूर्ण करत येईल यावर विचार केला जात आहे.
खासगी कंपन्यांनी अनेक गावात शुध्द पाण्याचे यशस्वी प्रकल्प सुरू केले आहेत. यवतमाळ तालुक्यातील मनपूर येथे मिनरल वॉटरचा प्लांट पूर्ण क्षमतेने सुरू आहे. याच गावात खासगी कंपन्यांनी शंभरावर शेततळे खोदले आहेत. त्यांनी केवळ आमची कामे शासकीय योजनेतून झाली, असे दाखवू नका एवढ्याएकाच अटीवर सहकार्य करण्यास सहमती दर्शविली आहे. त्यामुळे आणखी शासकीय योजनांना गती मिळणार आहे. विशेष करून शौचालय निर्मितीची योजना, जलयुक्त शिवार अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)