खासगी रुग्णालयातील जैविक कचरा उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 04:26 PM2021-11-23T16:26:06+5:302021-11-23T16:30:09+5:30
खासगी रुग्णालयातील जैविक कचरा गोदणी मार्गावरील फिल्टर प्लांटसमोर बेवारस फेकला जात आहे. हा जैविक कचरा इतर नागरिकांसाठी घातक आजार पसरविण्याचे साधन ठरू शकतो.
यवतमाळ : मानवी आरोग्यासाठी अतिशय घातक असलेला रुग्णालयातील जैविक कचरा बेवारस फेकला जात आहे. येथील गोदणी मार्गावरील फिल्टर प्लांटसमोर एका झुडपात हा कचरा टाकण्यात आला. एका जागरूक युवकाला तो दिसला. त्याने याबाबत पाठपुरावा सुरू केला. या परिसरात माॅर्निंग वाॅकला येणाऱ्या नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तब्बल ३७६ नागरिकांच्या स्वाक्षरीने निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
शहरातील खासगी रुग्णालय, पॅथाॅलाॅजी येथून निघणारा जैविक कचरा हा इतर नागरिकांसाठी घातक आजार पसरविण्याचे साधन ठरू शकतो. त्यामुळे असा कचरा हाताळणे व नष्ट करण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे. त्यानंतरही सार्वजनिक आरोग्याला धोका उत्पन्न होईल, अशा पद्धतीने हा कचरा शहरातील आजूबाजूला फेकला जातो. ही गंभीर बाब वारंवार निदर्शनास आणून देण्यासाठी राहुल दाभाडकर या युवकाचा लढा सुरू आहे. पालिका प्रशासनाने अशा रुग्णालय व पॅथाॅलाॅजींवर थेट फाैजदारी कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, दुर्दैवाने याकडे दुर्लक्ष होत आहे.
गोदणी मार्गावर रक्ताने माखलेले कापसाचे बोळे, काही मानवी शरीरातील अवयव, सलाईन, सिरीन, ड्रेसिंगचे साहित्य बेवारसपणे फेकून दिले. या ठिकाणी मोकाट कुत्रे येतात. शिवाय, याची प्रचंड दुर्गंधीही पसरते. ही गंभीर बाब लक्षात येताच राहुल दाभाडकर याने त्या ठिकाणी जनजागृतीपर फलक लावला. शिवाय, हा गंभीर प्रकार पाहून संतापलेल्या नागरिकांनीसुद्धा स्वाक्षरीची मोहीम राबविली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मानवी आरोग्यासह पर्यावरणाची होणारी हानी तत्काळ थांबवावी, अशी मागणी करण्यात आली. या निवेदनाची प्रत जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, नगरपरिषद मुख्याधिकारी, उपवनसंरक्षक यवतमाळ यांना देण्यात आली आहे. या लढ्यात एमएच-२९ हेल्पिंग हॅन्ड फाऊंडेशन, कोब्रा ॲडव्हेंचर ॲन्ड नेचर क्लब, निसर्ग मित्र, माॅर्निंग वाॅक ग्रुप यांचा सहभाग आहे.
कचरा जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न
निसर्गमित्रांनी हा जैविक कचरा उघड्यावर टाकला जात असल्याचा प्रकार उजेडात आणला. समाज माध्यमांवर या प्रकाराचा सर्वांनीच जाहीर निषेध केला. स्थानिक पालिका प्रशासनाच्या कारभारावरही रोष व्यक्त केला. यानंतर अज्ञात व्यक्तीने हा जैविक कचरा जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. निसर्गमित्रांनी या ठिकाणी लावलेला फलकही काढून नेला. यावरून कचरा टाकणारे किती निर्ढावले आहे, याची कल्पना येते.