खासगी लाईनमन चढवाल, तर मनुष्यवधाचा गुन्हा
By admin | Published: April 25, 2017 01:05 AM2017-04-25T01:05:45+5:302017-04-25T01:05:45+5:30
विद्युत खांबावर दुरुस्तीसाठी खासगी लाईनमन चढविण्याचे प्रकार सर्रास होत आहेत. मात्र, अशा घटनांमध्ये आतापर्यंत १५०० पेक्षा अधिक गरीब मुलांचा मृत्यू झाला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे : सुस्तावलेल्या महावितरणला उर्जामंत्र्यांचा ‘करंट’, वीज उपकेंद्रांचे लोकार्पण
यवतमाळ : विद्युत खांबावर दुरुस्तीसाठी खासगी लाईनमन चढविण्याचे प्रकार सर्रास होत आहेत. मात्र, अशा घटनांमध्ये आतापर्यंत १५०० पेक्षा अधिक गरीब मुलांचा मृत्यू झाला आहे. यापुढे कोणत्याही लाईनमनने खासगी लाईनमन खांबावर चढवला आणि दुर्घटना झाली, तर संबंधित लाईनमनसह शाखा अभियंता, उपअभियंत्याविरुद्ध एफआयआर नोंदवून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
सोमवारी यवतमाळसह जिल्ह्यातील विविध उपकेंद्रांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर होते. यावेळी बोलताना उर्जा मंत्र्यांनी सुस्तावलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना कारवाईचे अनेक ‘करंट’ दिले. अनेक लाईनमन प्रकृतीमुळे, वाढत्या वयामुळे पोलवर चढू शकत नाही. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यास त्यांच्या मुलांना नोकरी देणार असल्याचे सूतोवाचही बावनकुळे यांनी केले.
सकाळी लोहारा एमआयडीसी येथून लोहारा, जवळा आणि रेणुकापूर येथील वीज उपकेंद्रांचे भूमिपूजन उर्जामंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर महावितरणच्या येथील मुख्य कार्यालयात जिल्ह्यातील विविध उपकेंद्रांच्या लोकार्पण व भूमिपूजन पार पडले. परंतु, हे उपकेंद्र ज्या स्थानिक आमदारांच्या मतदारसंघात आहे, त्यांच्या हस्ते तेथे लोकार्पणाचे फलक लावण्यात यावे, तसेच त्या परिसरातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती अशा लोकप्रतिनिधींना निमंत्रित करावे, अशी सूचना उर्जामंत्री बावनकुळे यांनी केली. यातून लोकशाही अधिक बळकट व सर्वसमावेशक होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मेहनती आहेत. या जिल्ह्यात तुलनेने कमी धरणं असूनही २ लाख २० हजार हेक्टरमध्ये रब्बी पिके घेतली जातात. सुरळीत वीज वितरणासाठी केंद्र सरकार आता पैसे देत आहे. केंद्राने पहिल्याच वर्षी सिंचनासाठी ८५ हजार कोटी दिले. एकट्या घाटंजी तालुक्याचा विचार केला तर तेथे १११ नाले आहेत. त्यावर निट बंधारे बांधले तर हा तालुका पंजाबपेक्षा कमी राहणार नाही. जिल्ह्यातील सिंचन दुप्पट केल्याविना आम्ही पुढील वेळी मते मागायला येणार नाही. ९ लाख हेक्टर जमीन लागवडयोग्य असूनही येथे वीजपुरवठा व्यवस्थित होत नव्हता. आज जे प्रकल्प उभे राहात आहेत, त्यातून शेतीला निश्चितच सुरळीत वीज मिळेल. येथील शेतकऱ्यांनी १५ लाख क्विंटल तूर उत्पादन केले आहे. तूर खरेदीचा पेच सोडविण्यासाठी उद्याच दिल्लीत बैठक घेणार असल्याचेही ना. अहीर म्हणाले.
पालकमंत्री तथा उर्जा राज्यमंत्री मदन येरावर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारात जिल्ह्यातील वीजपुरवठ्याच्या समस्या मिटविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. बावनकुळे यांच्या रूपाने योग्य माणूस योग्य ठिकाणी नेमण्यात आला आहे. त्यामुळे वीज समस्या लवकरच संपतील. या कार्यक्रमाला सहपालकमंत्री तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, आमदार डॉ. अशोक उईके, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार संजिवरेड्डी बोदकूरवार, आमदार राजू तोडसाम, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
मोबाईल अॅप वापरा, वीज ग्राहकांना मंत्र्यांचे आवाहन
उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महावितरणचे सीएमडी संजीवकुमार यांनी ग्राहकांच्या सोयीसाठी अत्यंत उपयुक्त मोबाईल अॅप तयार केला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक वीज ग्राहकाने तो वापरला तर अनेक समस्या सुटतील. मीटर रिडिंग वेळेवर न घेणे, बिल उशिरा मिळणे, अवाजवी बिल मिळणे अशा अनेकांच्या तक्रारी आहेत. मात्र, महिन्याच्या ३० तारखेला ग्राहकाने स्वत:चे आपल्या वीज मिटरचा फोटो घेऊन महावितरणच्या अॅपवर टाकायचा आणि तो महावितरणला सेंड करायचा. यामुळे सरासरी वीज बिल येणारच नाही. या शिवाय ग्राहकांच्या इतर कुठल्याही तक्रारींच्या मोबाईल अॅपद्वारे सहज निराकरण केले जणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.