खासगी प्राथमिक शाळांचा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 10:21 PM2017-08-10T22:21:46+5:302017-08-10T22:22:21+5:30
जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षकांचे वेतन तब्बल वर्षभरापासून अडवून ठेवण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षकांचे वेतन तब्बल वर्षभरापासून अडवून ठेवण्यात आले. वेतन पथक व शिक्षणाधिकाºयांकडून चालढकल केली जात आहे. त्यातच वेतन पथकात मुख्याध्यापकांचा अपमान केला जातो. या सर्व बाबींचा उद्रेक होऊन गुरूवारी जिल्हाभरातील खासगी प्राथमिक शाळांनी कडकडीत बंद पाळला, तर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात धरणे आंदोलन केले.
राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघाच्या हाकेला ओ देत जिल्ह्यातील संपूर्ण ७२ प्राथमिक शाळा बंद ठेवण्यात आल्या. सुमारे ५०० शिक्षकांनी यवतमाळात धाव घेऊन धरणे दिले. खासगी प्राथमिक शिक्षकांच्या या आंदोलनात विविध शिक्षक संघटनांनीही उडी घेतली. अमरावतीच्या शिक्षण संघर्ष संघटनेच्या संगिता शिंदे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे अशोक पोले, इब्टा शिक्षक संघटनेचे पुसद तालुकाध्यक्ष नरेंद्र पाटील, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे सिद्धार्थ भवरे, जिल्हा परिषद लिपीकवर्गीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र बुटके, दाभाडकर आदींनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी येऊन मार्गदर्शन केले. पुसद, वणी, घाटंजी, बाभूळगाव, राळेगाव अशा सर्वच तालुक्यातील शिक्षकांनी आंदोलनात हजेरी लावली. विशेषत: शिक्षिकांची संख्या लक्षणीय होती.
राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुधांशू काळे, उपाध्यक्ष विनोद मोहरे, सचिव नहुष दरबेशवार यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. वेतन पथकातील वरिष्ठ लिपिकावर तातडीने कारवाई करावी, प्राथमिक शिक्षकांचे वेतन तातडीने अदा करण्यात यावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
वैद्यकीय बिलासाठीही अडवणूक
खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकांसाठीही वेतन पथकातील ‘ती’ वरिष्ठ लिपिक अडवणूक करते. ‘पहले ग्रँट आने दो, फिर बिल देना’ अशा शब्दात कर्मचाºयांची बोळवण केली जाते. बिल तपासण्याचे काम पथकाच्या कार्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाºयाकडे दिले जाते. त्याच्यापुढे मुख्याध्यापकाला चक्क चार तास उभे ठेवले जाते, अशी आपबिती अनेकांनी धरणे आंदोलनादरम्यान मांडली.