दारव्हात शेतमालाची खासगी खरेदी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 11:39 PM2018-10-17T23:39:36+5:302018-10-17T23:39:58+5:30
शहर तसेच ग्रामीण भागात खुलेआमपणे सुरू असलेली शेतमालाची खासगी खरेदी पूर्णत: बंद करण्यात आली. बाजार समितीच्या स्थापनेनंतर प्रथमच हा चमत्कार घडला असून या ऐतिहासिक निर्णयाचा शेतकरी आणि बाजार समितीला मोठा लाभ होणार आहे.
मुकेश इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : शहर तसेच ग्रामीण भागात खुलेआमपणे सुरू असलेली शेतमालाची खासगी खरेदी पूर्णत: बंद करण्यात आली. बाजार समितीच्या स्थापनेनंतर प्रथमच हा चमत्कार घडला असून या ऐतिहासिक निर्णयाचा शेतकरी आणि बाजार समितीला मोठा लाभ होणार आहे.
येथील सहाय्यक निबंधक प्रेम राठोड यांनी या बदलासाठी प्रयत्न केले. व्यापाºयांबाबत त्यांनी कठोर भूमिका घेतली. त्यामुळे आता सर्व शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार केवळ बाजार समितीच्या प्रांगणात होत आहे. १९२१ मध्ये येथे बाजार समितीच्या स्थापननंतर खरेदी-विक्रीचे व्यवहार मार्केट यार्डमध्ये सुरू झाले. मात्र बाहेरसुद्धा व्यापारी खरेदी करीत होते. कापूस उत्पादक पणन महासंघाचा एकाधिकार संपुष्टात आल्यानंतर बाजार समितीच्या ‘सेस’वर मोठा परिणाम झाला. तसेच इतर शेतमालाचीसुद्धा खरेदी बाहेर होत असल्याने बाजार समिती अडचणीत आली होती.
अलीकडे व्यापाऱ्यांनी खुलोम दुकाने थाटून शेतमालाची खासगी खरेदी सुरू केली. बाजार समितीत एका दाण्याचासुद्धा व्यवहार होत नव्हता. याचा मोठा परिणाम शहराच्या बाजारपेठेवर झाला. खेडा खरेदीसुद्धा वाढली. खासगी खरेदीत शेतमालाचे दर आणि वजनात शेतकऱ्यांची लूट सुरू झाल्यानंतर खासगी खरेदी बंदसाठी भरपूर प्रयत्न झाले. मात्र हा प्रकार बंद करण्यात कुणालाही यश आले नाही.
यावर्षी येथील सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) प्रेम राठोड यांनी कठोर भूमिका घेतली. त्यांनी प्रथम व्यापाऱ्यांच्या दुकानावर धडक देऊन त्यांचे रेकॉर्ड ताब्यात घेतले. तपासणी केली असता बाजार समिती आणि व्यापाऱ्यांच्या रेकॉर्डमध्ये मोठी तफावत आढळली. नंतर त्यांनी खासगी खरेदी बंद करण्याचा विडा उचलला. सुरुवातीला बाजार समितीचे प्रशासक जी.एस.कुमरे यांच्यासह सर्व व्यापाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत खासगी दुकान व गोदाम बंद करून व्यापाऱ्यांनी मार्केट यार्डमध्येच शेतमालाची खरेदी करावी, खरेदी-विक्रीचे रेकॉर्ड ठेवावे, ट्रेडिंग कंपनीचे बोर्ड लावू नये, अशा सूचना दिल्या. यार्डमध्ये शेतमाल खरेदी करताना शेतकऱ्यांना २४ तासांत मालाचा चुकारा द्यावा, नियमानुसार हमाली, मापाई व तोलाई कपात करावी, शेतकऱ्यांच्या सोयीसाठी दिवसातून दोनदा हर्रास करावा, अशाही सूचना दिल्या. सूचनांचे पालन न झाल्यास कारवाईचा इशारा दिला.
यानंतर राठोड यांनी दुकानांमध्ये सरप्राइज व्हिजीट तसेच ग्रामीण भागात दौरे करून खेडा खरेदी बंद केली. आता संपूर्ण व्यवहार बाजार समितीच्या यार्डमध्ये होत आहे. त्यामुळे शेतकºयांसह समितीला लाभ होत आहे. समितीचा सेसही वाढणार आहे.
बाजार समितीला सेस, शेतमालाला भाव
शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार बाजार समितीच्या यार्डमध्ये व्हायला लागल्यामुळे ‘सेस’मध्ये मोठी वाढ होणार आहे. मागीलवर्षी कापूस व धान्य मिळून केवळ पाच लाख २१ हजार ८५० रुपये सेसपोटी मिळाले. यावर्षी यात चौपट वाढ होऊन २० लाखांच्यावर सेस मिळेल, असे सांगीतले जाते. सोयाबीनला खुल्या बाजारात प्रति क्विंटल दोन हजार ५०० ते दोन हजार ६०० रुपये दर मिळत होता. आता लिलावात तीन हजार २०० रुपये दर मिळत आहे. कापूसही ४५०० रुपयांवरून ५६०० रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या २८ महिन्यांपासून समितीच्या कर्मचाºयांचा पगार झाला नाही. मात्र आता समितीच्या उत्पन्नात वाढ होऊन हा प्रश्न मिटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.