प्रियदर्शिनी सूतगिरणी सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 11:58 PM2019-08-11T23:58:49+5:302019-08-11T23:59:51+5:30

मंदीच्या लाटेमुळे आर्थिक गर्तेत सापडल्याने बंद पडलेली प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणी पुन्हा नव्या जोमाने सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही माजी खासदार व सूत गिरणीचे अध्यक्ष विजय दर्डा यांनी दिली.

Priyadarshini's best efforts to start a yarn | प्रियदर्शिनी सूतगिरणी सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

प्रियदर्शिनी सूतगिरणी सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

googlenewsNext
ठळक मुद्देवार्षिक सर्वसाधारण सभा : अध्यक्ष विजय दर्डा यांची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मंदीच्या लाटेमुळे आर्थिक गर्तेत सापडल्याने बंद पडलेली प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणी पुन्हा नव्या जोमाने सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही माजी खासदार व सूत गिरणीचे अध्यक्ष विजय दर्डा यांनी दिली.
प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणीच्या संचालक मंडळाची बैठक रविवारी ११ आॅगस्ट रोजी येथे पार पडली. त्यानंतर लगेच सूत गिरणीची २८ वी सर्वसाधारण सभा घेण्यात आली. स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. सूत गिरणीचे अध्यक्ष विजय दर्डा यांनी सांगितले की, प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणी जोमात सुरू होती, सूत गिरणीने अनेक राज्यस्तरीय पुरस्कारही पटकाविले. परंतु सूत गिरणीत आगीची घटना घडली, त्यात कोट्यवधींचे नुकसान झाले. त्यातच काही वर्षांपूर्वी देशात मंदीची लाट आली, त्याचा फटका इतर क्षेत्राप्रमाणे टेक्सटाईल उद्योगालाही बसला. त्यातून बाहेर न निघाल्याने ११ डिसेंबर २०१६ पासून सूत गिरणी बंद पडली. मात्र ही सूत गिरणी पुन्हा नव्या जोमाने सुरू करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहे. त्यात कोणतीही कसर ठेवली जाणार नाही, अशी ग्वाही विजय दर्डा यांंनी दिली. ही सूत गिरणी पुन्हा सुरू झाल्यास नव्याने रोजगार निर्मिती होईल, त्याचा कुशल कारागिरांना लाभ मिळेल, असेही दर्डा यांनी सांगितले.
प्रास्ताविक सूत गिरणीचे उपाध्यक्ष, माजी आमदार कीर्ती गांधी यांनी केले. सहकारी तत्वावर राज्यात शेतकऱ्यांची ही एकमेव सूत गिरणी आहे. सहा हजार शेतकरी सभासद असलेल्या या सूत गिरणीची एकूण स्थिती, बंद पडण्यामागील नेमकी कारणे, ही सूत गिरणी पुन्हा सुरू करण्यासाठी सुरू असलेला संघर्ष, थकीत कर्जाच्या वसुलीसाठी बँकेचे आडमुठे धोरण, साखर कारखान्यांना एक न्याय व सूत गिरण्यांना दुसरा न्याय लावण्याची प्रशासनाची अन्यायकारक पद्धती आदी बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला. सूत गिरणी सुरू व्हावी, त्यातील अडथळे दूर व्हावे यासाठी सरकार, प्रशासन, बँक यांच्याशी सातत्याने पत्रव्यवहार, प्रत्यक्ष भेटी व वाटाघाटी सुरू असल्याचे कीर्ती गांधी यांनी सांगितले.
सभेचे संचालन व आभार प्रदर्शन सूत गिरणीचे संचालक माणिकराव भोयर यांनी केले. या सभेला संचालक मंडळातील सदस्य बाळासाहेब मांगुळकर, किशोर दर्डा, सीए प्रकाश चोपडा, डॉ. जाफर अली जीवाणी, जयानंद खडसे, राजीव निलावार, कैलास सुलभेवार, डॉ. अनिल पालतेवार, प्रकाशचंद्र छाजेड, सुधाकरराव बेलोरकर, माणिकराव भोयर, प्रताप तारक, संजय पांडे, देवकिसन शर्मा, लीलाबाई बोथरा, उज्वलाताई अटल तसेच सूत गिरणीचे सभासद उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांचे सूतगिरणीवर जातीने लक्ष
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणी पुन्हा नव्या जोमाने सुरू व्हावी यासाठी आग्रही आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी मुंबईत खास बैठकही लावली होती. या बैठकीला संबंधित सर्व सचिवस्तरीय अधिकारी, बँकांचे अधिकारी उपस्थित होते. सूत गिरणी सुरू होण्याच्या दृष्टीने बँकेशी चर्चा करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सचिव भूषण गगराणी यांना दिले आहेत. त्या अनुषंगाने वाटाघाटी सुरू आहेत. मुख्यमंत्री स्वत: या प्रकरणात जातीने लक्ष घालून सूत गिरणी सुरु होण्याच्या दृष्टीने आढावा घेत आहेत.

Web Title: Priyadarshini's best efforts to start a yarn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.